दोन महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी कांदिवली लोखंडवाला येथील एका इसमास समतानगर पोलिसांनी अटक केली आहे. सोसायटीत झालेल्या वादाच्या वेळी हा विनयभंगाचा प्रकार घडला होता
याबाबत माहिती देताना समतानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम यांनी सांगितले की, कांदिवलीच्या लोखंडवाला संकुलातील एका सोसायटीत मनोज मिश्रा (४७) राहतात. त्यांचा सोसायटीमधील इतर पदाधिकाऱ्यांशी वाद होता. सोमवारी संध्याकाळी सोसायटीच्या कार्यालयात बैठक सुरू असतांना मिश्रा याने तेथे जाण्याचा प्रयत्न केल्यावर तेथे असलेल्या दोन महिलांनी त्यांना आत येण्यास मज्जाव केला. यावेळी मिश्रा याने पोलिसांना पाचारण केले.
मिश्रा याने आपल्याला ढकलून विनयभंग केल्याची तक्रार महिलांनी पोलिसांत दाखल केली. त्या तक्रारीवरून मिश्रा याला समतानगर पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक केली. मिश्रा हा टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकांत सहाय्यक व्यवस्थापक आहे.