भरधाव वेगात वाहन चालविताना नियंत्रण सुटल्यानेच यवतमाळचे काँग्रेसचे आमदार नीलेश पारवेकर यांना आपला जीव गमवावा लागला. वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्याची पारवेकर यांना सवय होती. हे सारेच त्यांच्या जीवावर बेतले.
लाल दिवा किंवा सायरन वाजवत वेगाने वाहने हाकण्याची नेतेमंडळींना हौसच असते. काही नेतेमंडळी आपल्या चालकाला वाहन वेगात हाकण्यास भाग पाडतात. गेल्या रविवारी यवतमाळजवळ झालेल्या अपघातात काँग्रेसचे तरुण आमदार पारवेकर यांना आपला प्राण गमवावा लागला. जनावरे मध्ये आल्याने त्यांना वाचविण्याच्या नादात गाडीवरील त्यांचा ताबा सुटला आणि गाडीने तीन कोलांटउडय़ा खाल्ल्या. सीटबेल्ट लावलेल्या त्यांच्या शेजारीच बसलेल्याला मार लागला पण ते वाचले. बेल्ट नसल्याने पारवेकर बाहेर फेकले गेले . अपघात झाला तेव्हा ते मोबाईलवर बोलत नव्हते, असे सांगण्यात येत असले तरी त्यांना गाडी चालविताना मोबाईलर बोलण्याची सवय होती, असे सांगण्यात येते. तेलगू देशमचे नेते येरन नायडू हे अलीकडेच अपघातात ठार झाले होते. ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या वाहनाने एस. टी. बसला समोरून धडक दिली होती. काँग्रेसचे नेते राजेश पायलट हे वेगाने वाहन चालविताना झालेल्या अपघातात ठार झाले होते. कर्करोगासारख्या दुर्धर आजारातून बरे झालेले काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. श्रीकांत जिचकार हे काटोलजवळ अपघातात ठार झाले होते. माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हेही वाहन अपघातात गंभीर जखमी झाले होते व त्यातच निधन झाले.

Story img Loader