भारतीय भटके व विमुक्त विकास, संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष व माजी आमदार लक्ष्मण माने यांच्या विरुद्ध बुधवारीआणखी एका महिलेने शारीरिक व मानसिक छळाची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात दिली, यामुळे माने यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्या महिलांची संख्या चार झाली आहे. दरम्यान महिलांवरील अत्याचारांप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या माने यांचा पोलिसांना अद्याप ठावठिकाणा लागलेला नसून त्यांच्या शोधार्थ पुणे व कोल्हापूर येथे पथके रवाना करण्यात आली आहेत. दुसरीकडे रिपब्लिकन पार्टीसह अनेक संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याची सखोल चौकशी करत कारवाईची मागणी केली आहे.
लक्ष्मण माने यांच्या विरुद्ध तीन दिवसांपूर्वी एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर आणखी दोन महिलांनीही अशीच तक्रार दाखल केली होती.
महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांना माने यांना अद्याप ताब्यात घेता आलेले नाही. त्यांच्या संस्था व इतर ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा मिळू शकला नाही म्हणून पुणे व कोल्हापूर येथे पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्यासह इतर अनेक संघटना व संस्थांनी या कामी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान भाजप पाठोपाठ शिवसेनेनेही या प्रकरणाचा सखोल तपास करून कारवाई करण्याची मागणी जिल्हधिकाऱ्यांकडे केली.  माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपपाठोपाठ शिवसेनेच्याही महिला आघाडीने या प्रकरणी आंदोलन केले. महिला आघाडीच्या नंदिनी कोंढाळकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

Story img Loader