पाकिस्तानी कलाकारांना विरोधाच्या मुद्द्यावर शिवसेना अजूनही ठाम असून, पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईतील आणखी एक नियोजित कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधानंतर रद्द करण्यात आला आहे. शुक्रवार २९ जानेवारीला मुंबईत अंधेरी येथील ‘द क्लब’ या ठिकाणी गुलाम अली येणार होते. मात्र, शिवसेना चित्रपट सेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आयोजक सुहैब इल्यासी यांनी दिली आहे.

याआधीही मुंबईतील षण्मुखानंद सभागृहातील गुलाम अलींचा नियोजित कार्यक्रम शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱयानंतर रद्द करण्यात आला होता. शिवसेनेच्या या विरोधानंतर राजकारण चांगलेच तापले होते. मुंबईनंतर पुण्यातही गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला होता, तर शिवसेनेच्या भूमिकेचा निषेध करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  गुलाम अलींना दिल्लीत कार्यक्रम घेण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर नुकतेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संस्थेमार्फत येत्या फेब्रुवारी महिन्यात कळवा-खारेगाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ठाणे फेस्टिव्हलसाठी सुप्रसिद्ध पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली यांच्या गझलसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जोरदार संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader