महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ओबीसी बांधव आता बुद्ध धम्माच्या वाटेवर’ या अभियानाचा परिणाम म्हणून ओबीसींमधील निरनिराळ्या जातींतील सुमारे एक हजार कुटुंबांनी धर्मातर करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यापैकी ३५० कुटुंबांनी तशी प्रतिज्ञपत्रे देऊन बौद्ध धम्म स्वीकार करण्यासाठी नोंदणी केली आहे. कोल्हापूरमध्ये ५ जानेवारीला होणाऱ्या सहाव्या विभागीय परिषदेत आणखी ६०० ते ७०० कुटुंबांची धर्मातरासाठी नोंदणी होणार आहे. १४ ऑक्टोबर २०१६ ला मोठय़ा प्रमाणावर ओबीसी समाज धर्मातर करून बौद्ध धम्माचा स्वीकार करील, अशी माहिती सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी दिली.
गेल्या दीड वर्षांपासून ‘ओबीसी बांधव आता बुद्ध धम्माच्या वाटेवर’ अशी चळवळ सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून विभागवार परिषदा घेण्यात आल्या. नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकनंतर आता  ५ जानेवारी २०१४ ला कोल्हापूर येथे सहावी परिषद आयोजित करण्यात आली आहे. ओबीसींमधील माळी, तेली, कुंभार, भावसार, परिट, आगरी, कोष्टी, सोनार,आदी जातींमधील ३५० कुटुंबांनी आम्ही यापुढे हिंदु धर्मातील कोणतेही कर्मकांड करणार नाही आणि बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहे, अशी प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. कोल्हापूरच्या परिषदेत आणखी ६०० ते ७०० कुटुंबांची धर्मातरासाठी नोंदणी होणार आहे असे उपरे  यांनी सांगितले.

Story img Loader