लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मध्य रेल्वेच्या शीव स्थानकावरील ब्रिटीशकालीन ११२ वर्षे जुन्या उड्डाणपूलाचे पाडकाम नुकतेच सुरू झाले असून या पुलाचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्षात पूल खुला होण्यास एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. शीव उड्डाणपूल खुला करण्यासाठी ३१ मे २०२६ चे उद्दीष्ट्य ठरवण्यात आले आहे.
मुंबईत उड्डाणपुलांची अनेक कामे सुरू आहेत. अंधेरीचा गोखले पूल, मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल, दादरचा टिळक पूल, मशीद बंदर येथील कर्नाक उड्डाणपूल, विक्रोळी उड्डाणपूल यांची कामे सुरू आहेत. त्यापैकी बेलासिस पूल, कर्नाक पूल, शीव उड्डाणपूल या पूलांच्या कामांना वेग यावा, वाहतूक खोळंबा होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, वाहतूक पोलिस व रेल्वे विभागांच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. या पुलांच्या कामांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी काल आढावा घेतला. त्यात या तीन पुलांची कामे पूर्ण करण्यासाठी उद्दीष्ट्य ठरवण्यात आले. पोलिस सह आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शीव (सायन), बेलासिस व कर्नाक पूल या रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलांच्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला. यावेळी महानगरपालिकेच्या संबंधित विभागांचे अधिकारी, रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शीव उड्डाणपूल दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. शीव स्थानकाच्या पश्चिम बाजूस ‘बेस्ट’वाहिन्यांचे स्थलांतरण करण्याचे काम २७ एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होईल. झाडांच्या फांद्या छाटण्याची परवानगी महानगरपालिकेच्यावतीने देण्यात येईल. रेल्वे विभागामार्फत पादचारी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो जून महिन्यात महानगरपालिकेच्या ताब्यात येईल. त्यानंतर रेल्वे विभाग हद्दीतील पुलाचे उर्वरित पाडकाम करण्यात येईल. भुयारी मार्गासाठी रेल्वे विभागामार्फत ऑगस्ट २०२५ मध्ये जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मात्र, पावसाळ्याच्या कालावधीत काम सुरू करता येणार नसल्याने दिनांक १ ऑक्टोबर २०२५ पासून भुयारी मार्गांचे काम सुरू करण्यात येईल. पश्चिम बाजूस दोन तर पूर्व बाजूस एका पोहोच रस्त्याचे काम केले जाणार आहे. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सुसमन्वय साधून पश्चिम बाजूचे पोहोच रस्ते मार्च २०२६ पर्यंत आणि पूर्व बाजूचा पोहोच रस्ता मे २०२६ पर्यंत पूर्ण करावा, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले. तर, रेल्वे हद्दीतील कामे मे २०२६ पर्यंत पूर्ण होऊ शकतील, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
बेलासिस पुलाला नोव्हेंबरची मुदत
मुंबई सेंट्रल येथील बेलासिस पुलाच्या कामाचा पूर्णत्वाचा कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून नोव्हेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्याचे उद्दीष्ट्य मुंबई महापालिकेने ठेवले आहे.
कर्नाक पूलचे काम अंतिम टप्प्यात
मशीद बंदर रेल्वे स्थानकानजीकच्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पूर्व दिशेला ८ खांब पूर्ण झाले असून ४० पैकी ५ लोखंडी तुळया (गर्डर) प्रकल्पस्थळी आल्या आहेत. ५ जून २०२५ पर्यंत दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते तयार करून १० जून २०२५ पर्यंत पुलाच्या मुख्य वाहतूक मार्गाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले.
पूल आणि मुदत
- बेलासिस पूल- ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत
- कर्नाक पूल- १० जून २०२५ पर्यंत
- शीव उड्डाणपूल- ३१ मे २०२६ पर्यंत