उत्तम प्रतीचा कांदा किरकोळ बाजारात ३० रुपयांवर
प्रतिकूल हवामानाचा फटका उत्पादनावर झाल्याने घाऊक बाजारात कांद्याचे दर झपाटय़ाने वाढू लागले असून बुधवारी दिवसभरात कांद्याच्या दरांनी १८ रुपयांपासून उसळी घेत थेट २४ रुपयांचा पल्ला गाठला. अवघ्या आठवडाभरात किलोमागे सहा रुपयांची वाढ झाल्याने कांद्याचा किरकोळ बाजार चांगलाच तेजीत आला असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील काही बाजारांमध्ये उत्तम प्रतीचा कांदा किलोमागे ३० ते ३२ रुपयांना विकला जात आहे.
देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणावर घटल्याचा परिणाम दिसून येत आहे. मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याचे दर मंगळवारच्या तुलनेत क्विंटलमागे ४०० रुपयांनी वाढून २३७९ रुपयांवर पोहोचले. त्याचा परिणाम किरकोळ बाजारात दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातून वाशीच्या घाऊक बाजारात कांदा घेऊन येणाऱ्या अध्र्याअधिक गाडय़ा रिकाम्या येत आहेत, अशी माहिती कांदा-बटाटा व्यापारी संघाचे व्यापारी चंद्रकांत रामाणे यांनी दिली. आठवडाभरापूर्वी दर किलोमागे १६ ते १८ रुपये असे होते. मात्र, दोन दिवसांपासून घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा कांदा किलोमागे २२ ते २४ रुपयांनी विकला जात असून किरकोळ बाजारात त्याला ३० ते ३२ रुपये दर आहे, असे रामाणे यांनी सांगितले.