पुढील महिन्यात आणखी दरवाढीची शक्यता

मुंबई : कांदा पिकाला वेळेआधी हजर झालेल्या पावसाचा फटका बसला असून कांद्यांची बाजारातील आवक घटल्याने त्याचे भाव वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा सध्या ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. जुलैमध्ये हे दर अधिक वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यभर झालेल्या पावसाने कांद्याच्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे तयार कांदे भिजले, तर कुठे लागवडीवर परिमाण झाल्याने कांद्यांची अपेक्षित आवक होऊ शकली नाही. त्यामुळे सध्या कांद्यांचे भाव वाढले आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलोमागे ५ ते ७ रुपयांनी, तर किरकोळ आजारात ८ ते १० रुपयांनी दरवाढ झाली आहे. घाऊक बाजारपेठेत १२ ते १५ रुपये प्रतिकिलोने मिळणारा चांगला कांदा २० ते २५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. तर १४ ते १७ रुपये प्रतिकिलो अशा दराने कमी प्रतीचा कांदा उपलब्ध आहे. घाऊक बाजारपेठेतील दर वाढल्याने किरकोळ बाजारातही कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे. गेल्या आठवडय़ात साधारण २० ते २२ रुपये प्रतिकिलोने मिळणारा चांगल्या प्रतीचा कांदा गुरुवारी ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोने विकला जात होता.

‘आठ दिवसांपासून कांद्याचे दर चढायला सुरुवात झाली. पावसाच्या माऱ्यामुळे उत्तम प्रतीचा सुका कांदा केवळ ३० टक्केच येतो आहे. उर्वरित ७० टक्के कांदा कमी प्रतीचा आहे. शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाल्याने ही भाववाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे तयार कांदे आहेत, पण आताही पाऊस सुरू असल्याने त्याची साठवणूक करणे आव्हानात्मक होत आहे. परिणामी जुलै महिन्यात कांद्याचे भाव आणखी वाढतील,’ असे वाशी एपीएमसी बाजारातील कांदा व्यापारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

येत्या काळात कांदा आणखी महागेल. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने ८-१० रुपये प्रतिकिलोने कांदा देणे शेतकऱ्यांना नुकसानीचे ठरत आहे. या दरात लागवडीचा खर्च सुटणेही कठीण असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशेने कांदा वखारींमध्ये साठवला आहे.

– विलास भुजबळ, कांदा व्यापारी

Story img Loader