पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात यंदा झालेले कांद्याचे कमी उत्पादन, अवकाळी पाऊस, चाळीतील कांद्याची कमी होणारी संख्या, एकंदरीत वातावरण यामुळे यंदा कांद्याच्या भाववाढीला सुरुवात झाली असून घाऊक बाजारात तीस रुपये किलो असलेला कांदा किरकोळ बाजारात चाळीस रुपयांनी विकला जात आहे. ही भाववाढ हळूहळू वाढण्याची भीती व्यापारी व्यक्त करीत असून गेली अनेक वर्षे निर्माण होणाऱ्या या स्थितीवर सरकार कायमस्वरूपी उपाययोजना करीत नसल्याने कांद्यालाही आता हमीभाव देण्याची मागणी वाढू लागली आहे.
मार्च, एप्रिल, मेमध्ये चाळीमध्ये साठवणूक केलेला कांदा आता बाजारात पाठविला जात असून त्याची आवक दिवसेंदिवस घटत आहे. शुक्रवारी तुर्भे येथील कांद्याच्या घाऊक बाजारात ९० ट्रक भरून कांदा आला होता. कांद्याच्या किरकोळ बाजारातील गरज यापेक्षा जास्त असल्याने घाऊक बाजारात कांद्याने २८ ते ३० रुपये भाव घेतला आहे. हाच कांदा किरकोळ बाजारात ३५ ते ४० रुपये दराने विकला जात आहे. बाजारात येणाऱ्या कांद्याची गुणवत्ता ढासळली असून कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सरकारी नियमानुसार बांधण्यात आलेल्या चाळीतील कांदा पावसाळ्यात खराब होऊ लागल्याने त्याची साठवणूक कमी होऊ लागली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात त्याची आवक घटली असून त्याचा परिणाम भाववाढीवर झाल्याचे व्यापारी अशोक वाळुंज यांनी सांगितले. पुढील महिन्यात सुरू होणारा श्रावण, त्यानंतरचा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या काळात ही दरवाढ आणखी होण्याची भीती व्यक्त केली जात असून सरकार कांद्याच्या भावासंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा