राज्यभरातील दुष्काळामुळे कांद्यांचे उत्पादन घटल्यामुळे भाज्यांपाठोपाठ गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे घाऊक दरही वाढण्यास सुरुवात झाली असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील काही प्रमुख बाजारांमध्ये उत्तम प्रतीचा कांदा थेट ३० ते ३५ रुपयांनी विकला जाऊ लागला आहे. वाशी येथील घाऊक बाजारात हे दर १८ ते २० रुपयांच्या घरात आहेत.
काही माहिन्यापूर्वी घेतलेल्या लाल कांदयाचे उत्पादन संपत असताना तुलनेने नवा कांद्याचे पीक पुरेशा प्रमाणात आलेले नाही. त्यामुळे एरवी लासनगावच्या पिकावर अवलंबून असणाऱ्या मुंबईकरांना मध्यप्रदेशातील इंदोर येथून येणाऱ्या कांद्यावर  गुजरण करावी लागत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना  दररोज किमान १५० ते १८० गाडय़ा भरुन कांद्याची गरज लागते. मोठी हॉटेल्स तसेच उपहारगृहांमध्ये यापैकी सरासरी ८० ते १०० गाडी कांदा लागतो. गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण ८० ते १०० गाडय़ांपर्यत आले असून अध्र्याअधीक कांदा टेम्पोसारख्या तुलनेने लहान वाहनांमधून येत आहे, अशी माहिती कांदा-बटाट व्यापारी संघाचे ज्येष्ठ व्यापारी चंद्रकांत रामाणे यांनी लोकसत्ताला दिली. त्यामुळे मागणी जास्त पुरवठा कमी असे चित्र निर्माण होऊ लागले आहे.  येत्या काळात कांद्याचा दुष्काळ निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असून या दरांमध्ये आणखी वाढ होईल, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.