आपला त्रास वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन करण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या योजनेचा पहिल्याच वर्षी पुरता बोऱ्या वाजला आहे. रडतखडत चाललेल्या संकेतस्थळाच्या मदतीने ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच उरकण्याच्या विद्यापीठाच्या अट्टहासामुळे हजारो विद्यार्थ्यांची परवड होते आहे. या मनस्तापाबाबत गेले चार दिवस सातत्याने ओरड होऊनही विद्यापीठ प्रशासन ढिम्म हललेले नाही.
गेले आठवडाभर ऑनलाइन नोंदणीच्या फेऱ्यात अडकलेले हजारो विद्यार्थी विद्यापीठाच्या कलिना संकुलातील नोंदणी विभागात चकरा मारत आहेत. त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यास येथील कर्मचारीही सक्षम नाहीत. त्यामुळे प्रवेशाची संधी हुकणार या कल्पनेने विद्यार्थी अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. मिठीबाई महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने गुणांच्या रकान्यात भरलेली संख्या बदलण्यासाठी म्हणून ऑनलाइन अर्जावर पुन्हा क्लिक केले तर तिचा संपूर्ण अर्जच दिसेनासा झाला. नंतर वारंवार प्रयत्न करूनही तिला नोंदणी करता आली नाही. म्हणून तिने कलिनातील नोंदणी विभाग गाठला. पण, तेथील कर्मचाऱ्यांनाही तिची नोंदणी करून घेता न आल्याने ती अक्षरश: रडकुंडीला आली होती.
‘अकाऊंट अ‍ॅण्ड फायनान्स’ हा विषय घेऊ इच्छिणाऱ्या एका विद्यार्थ्यांने संकेतस्थळावर दाखविण्यात आलेल्या महाविद्यालयांपैकी एक म्हणजे एसआयईएस निवडले. अर्जाची प्रिंटआऊट घेऊन प्रवेश अर्ज घेण्यासाठी हा विद्यार्थी गेला असता महाविद्यालयाने हा विषयच आपल्याकडे नसल्याचे सांगितले. त्यामुळे, पुन्हा एकदा नोंदणी अर्जाची प्रिंटआऊट घेऊन त्याला अन्य  महाविद्यालयांमध्ये फिरावे लागणार आहे. कासवाच्या गतीने चालणाऱ्या संकेतस्थळावरून पुन्हा एकदा प्रिंटआऊट काढावे लागणार, या विचारानेच माझ्या पोटात गोळा आला आहे, अशी प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांने दिली.
ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्यापासून हजारो विद्यार्थ्यांना याच अनुभवातून जावे लागले आहे. ‘यापेक्षा आधीची प्रक्रिया सोपी आणि खिशाला कमी चाट पाडणारी होती. विद्यापीठाच्या ऑनलाईन नोंदणीच्या दिव्यातून जाण्यापेक्षा संबंधित महाविद्यालयात अर्ज भरलेला परवडला. नाहितरी प्रत्येक ठिकाणी स्वतंत्रपणे प्रवेश अर्ज भरावा लागतोच आहे. त्यात एका अर्जाची भर,’ अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्यांने व्यक्त केली.
मुदत वाढविली
 प्रवेशासाठी अर्ज करण्याची उद्या (शुक्रवारी) शेवटची मुदत होती. पण, आता ती वाढवून १० जून करण्यात आली आहे. १० जून रोजी सकाळी १० पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता प्रवेशाची पहिली यादी लावली जाईल.

सारे सुरळीत असल्याचा दावा
या सगळ्यावर विद्यापीठ मात्र सर्व आलबेल असल्यासारखेच वागते आहे. आतापर्यंतच्या नोंदणीचे आकडे तोंडावर फेकून सगळे कसे सुरळीत आहे, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र करतात. पण, ही नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या दिव्यातून जावे लागले, यावर मात्र त्यांच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते. ‘कुणावरही अन्याय होणार नाही,’ असे मोघम उत्तर त्यांनी दिले.