* अवघ्या ४५ मिनिटांत पैसे लंपास
* ५३ लाखांची वसुली
मुलुंड येथील एका व्यावसायिकाच्या ‘ऑनलाइन’ बँकखात्यातून ‘आरटीजीएस’द्वारे अवघ्या ४५ मिनिटांत एक कोटी रुपये लंपास करणाऱ्या २७ वर्षीय तरुणास मुलुंड पोलिसांनी सायबल गुन्हे विभागाच्या मदतीने तातडीने अटक केली. त्याच्याकडून ३० लाख रुपये हस्तगत करण्यात आले असून नवी मुंबई आणि गोरेगाव येथून आणखी २३ लाख रुपये वसूल करण्यात पोलिसांना यश मिळाल्याचे कळते. याबाबत अधिकृत दुजोरा मात्र मिळू शकला नाही.
एका सौंदर्य प्रसाधन कंपनीत संचालक असलेले अंकुर कोराने यांचे कॉर्पोरेट खाते येस बँकेत आहे. गुरुवारी सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांचा मोबाइलवर १२ लाख रुपये हस्तांतरित झाल्याचा लघुसंदेश आला. असा कुठलाही ऑनलाइन व्यवहार केलेला नसताना आलेल्या या संदेशाने चक्रावलेले कोराने सावरतात न तोच दहा वाजेपर्यंत एकापाठोपाठ एक असे बारा संदेश त्यांना आले व एकूण एक कोटी रुपये त्यांच्या खात्यातून वळते करण्यात आले होते. कोराने यांनी तात्काळ मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलुंड पोलिसांनी सायबर गुन्हे विभागाला ही माहिती दिली.
वांद्रे-कुर्ला संकुलातील सायबर गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ हालचाली करून एक कोटीपैकी ४६ लाख रुपये हस्तांतरित होता होता वाचविले. त्यामुळे कोराने यांना प्रत्यक्षात ५४ लाखांचा फटका बसला. परंतु सायबर गुन्हे विभागाच्या मदतीने मुलुंड पोलिसांनी तात्काळ कारवाई करून टॉय परेरा या तरुणास वसई येथून अटक केली. परेरा याने ३० लाख रुपये आपल्या वसईतील बँकखात्यात वळते करून घेतले होते. यापैकी काही पैसे काढून घेण्याच्या तयारीत असतानाच त्याला अटक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर लगेचच नवी मुंबई आणि गोरेगाव येथील संबंधित बँकांना सावध करण्यात आले आहे. याशिवाय दिल्लीतूनही एक रक्कम वळती झाल्याने तेथील पोलिसांनाही सतर्क करण्यात आल्याचे कळते. मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्य़ात प्रत्यक्षात ९० लाखांची फसवणूक झाल्याचे म्हटल्याचे सायबर गुन्हे विभागातील सूत्रांनी सांगितले.

Story img Loader