नमिता धुरी

सर्वसाधारणपणे मूल आधी शाळा पाहते आणि नंतर तेथे त्याचे शिक्षण सुरू होते. पण टाळेबंदीच्या पिढीतील मुलांची शैक्षणिक वाटचाल शाळेचे दर्शन घडण्यापूर्वीच सुरू होत आहे. मुलांच्या डोळे आणि कानांवर ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम होण्याची भीती प्राथमिक आणि माध्यमिक इयत्तांच्या पालकांना वाटत असताना, दुसऱ्या बाजूला दीड ते सहा वयोगटाची शाळापूर्व तयारीही ऑनलाइन सुरू झाली आहे. कोणी ‘प्ले-ग्रुप’च्या नावाखाली तर, कोणी ‘पेरेंट-टोड्लर प्रोग्राम’च्या नावाखाली दीड वर्षांच्या बाळांना स्क्रीनसमोर बसण्यास भाग पाडत आहे.

चेंबूरच्या ‘द ग्रीन एकर्स अ‍ॅकॅ डमी’ने दीड ते साडेतीन वर्षांच्या मुलांसाठी ऑनलाइन पेरेंट टोड्लर प्रोग्राम सुरू केला आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठीचे प्रवेशही पूर्ण झाले आहेत. तीन महिन्यांचे तीन हजार रूपये भरून बालक-पालक यांनी रोज दिवसातून एक तास स्क्रीनसमोर बसायचे. या वेळी मुलांना खेळ व कलेच्या माध्यमातून शिक्षण दिले जाईल. प्लेग्रुपपासून सिनिअर के जीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मात्र औपचारिक विषयांचे शिक्षण ऑनलाइन दिले जाणार आहे. ‘लर्निग कव्‍‌र्ह इंडिया’ या शाळेच्या प्लेग्रुपमध्ये दीड वर्षांच्या मुलांनाही प्रवेश दिला जातो. रोज पाऊण ते एक तास चालणाऱ्या ऑनलाइन तासिकांमध्ये कला व खेळांसोबत गणितीय संकल्पनाही शिकवल्या जातात.

बदलापूरच्या ‘शूलिन इंटरनॅशनल प्री-स्कू ल’चे ऑनलाइन वर्ग दोन ते सहा वयोगटासाठी भरणार आहेत. सोमवार ते शुक्रवार प्रत्येकी चाळीस मिनिटांच्या दोन तासिका होतील. यात आडवी रेषा, उभी रेषा अशा संकल्पना शिकवल्या जातील. यासाठी पालकांना एक हजार रुपये नोंदणी शुल्क भरायचे आहे.

शिवाय ओळखीपाळखीतल्या एखाद्या मुलाचा प्रवेश मिळवून द्या आणि नोंदणी शुल्कात पन्नास टक्के सूट मिळवा, असेही आमिष शाळा पालकांना दाखवते. म्हणजेच जास्तीत जास्त लहान मुलांना ऑनलाइनच्या जाळ्यात अडकवण्यासाठी पालकांचीही मानसिकता तयार केली जाते. तीन हजार रुपये शुल्क घेऊन सुरूवातीला ऑनलाइन पुस्तके  व नंतर छापील पुस्तके  पुरवली जातील. शिवाय शिकवणीचे प्रतिमहिना एक हजार रुपये वेगळे घेतले जातील.

अभ्यासक्रम असा..

ठाण्याच्या ‘पेपर प्लेन प्री-स्कू ल’ने प्ले-ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी रोज अर्ध्या-पाऊण तासाचे गुगल क्लासरूम आयोजित केले आहेत. गाणी, हस्तकला, पपेट शो, गोष्टी या माध्यमातून मुलांना अक्षरओळख वगैरे करून दिली जाणार आहे. गोराईच्या ‘लिटिल मिलेनियम’ शाळेचे ऑनलाइन वर्ग दिवसातून फक्त १५ मिनिटेच भरणार आहेत. शाळेचे वर्षभराचे शुल्क ४२ हजार रुपये आहे. मात्र, हे शुल्क शून्य टक्के व्याजदरासह ९ हप्त्यांमध्ये भरण्याची मुभा देत असल्याचे आमिष शाळा दाखवत आहे. टाळेबंदीनंतर शैक्षणिक साहित्यही दिले जाईल. ‘हॅलो किड्स इंडिया’ शाळेनेही ऑनलाइनचा कित्ता गिरवायला सुरूवात केली आहे. काही शाळा लाइव्ह तासिका घेऊन थांबत नाहीत तर, नंतर पाहण्यासाठी काही चित्रफितीही पाठवतात.

Story img Loader