कल्याण डोंबिवली पालिकेत सन २०११ मध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या १६८ कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन नोकरभरतीत घोटाळा झाल्याच्या तक्रारीवरून शासनाने या नोकरभरतीची नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या संचालकांकडून चौकशी सुरू केली .
पालिकेत वर्ग एक ते तीन संवर्गातील कर्मचारी या ऑनलाईन नोकरभरतीमधून भरती करण्यात आले आहेत. माजी आयुक्त रामनाथ सोनवणे, उपायुक्त गणेश देशमुख यांच्या कारकिर्दीत ही भरती करण्यात आली आहे. ‘एमकेसीएल’ने काही अपात्र उमेदवारांना पात्र ठरवून त्यांच्या लेखी परीक्षा घेतल्या. हे अपात्र उमेदवार उत्तीर्ण झाले. या गैरप्रकाराची  तक्रार जाताच प्रशासनाने सारवासारव करून लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांना झालेला गैरप्रकार दडपण्यासाठी तोंडी परीक्षेत अनुत्तीर्ण केले. माजी आयुक्त सोनवणे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. त्यांनी दुर्लक्ष केल्याची तक्रार सिध्दार्थ कांबळे या नागरिकाने केली .
नोकरभरती पारदर्शक – देशमुख
ऑनलाईन नोकरभरती पारदर्शक असून पोलिसांना त्यामध्ये तथ्य आढळून आलेले नाही. पालिकेने या भरतीचा अहवाल शासनाला पाठविला आहे. याप्रकरणातील उमेदवारांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याचे उपायुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.