देशभरातील ‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’ या वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी मे, २०१३ मध्ये होणाऱ्या ‘नॅशनल एन्ट्रन्स कम एलिजिबिलीटी टेस्ट’ (नीट) या प्रवेश परीक्षेसंबंधातील वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला तरी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’ने (सीबीएसई) सुरू केली आहे.
‘नीट’चे अस्तित्त्व अजुनही न्यायालयीन वादात अडकले आहे. विविध राज्यातील उच्च न्यायालयांनी वेगवेगळ्या कारणांसाठी ‘नीट’ला स्थगिती दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून ‘नीट’संबंधातील सर्व प्रकरणे आपल्याकडे घेऊन सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच ‘नीट’ परीक्षेची जबाबदारी असलेल्या ‘सीबीएसई’ने १ डिसेंबरला जाहीरात देऊन मे, २०१३ मध्ये होणाऱ्या ‘नीट’साठी अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे.
मंडळाच्या http://www.cbseneet.nic.in  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ‘नीट’साठी ऑनलाईन अर्ज करता येईल. एक हजार रूपये (मागासवर्गीय व शारीरिकदृष्टय़ा विकलांग विद्यार्थ्यांकरिता ५५०रूपये) इतक्या शुल्कासह ३१ डिसेंबपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. दोन हजार रूपये इतक्या विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत १ ते ३१ जानेवारी, २०१३ अशी आहे. ऑनलाईन अर्ज ५ फेब्रुवारीपर्यंत कायम करायचे आहेत.
खासगी महाविद्यालयांना कोण आवरणार?
देशभरात ५ मे, २०१३ रोजी होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेतून राज्यातील सरकारी महाविद्यालयांसह खासगी, अभिमत विद्यापीठे आदी सर्व प्रकारच्या वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश होणे अपेक्षित आहेत. मात्र, ‘एएमपीएमयूडीसी’ या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या संघटनेने आपल्या २६ ‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’ महाविद्यालयांसाठी ‘असो-सीईटी’ या स्वतंत्र प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविणे सुरू केल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा गोंधळ आहे. ‘नीट’च्या अस्तित्त्वावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या लढय़ामुळे आम्ही या वर्षी आमची स्वतंत्र परीक्षा घेत आहोत, असा खासगी महाविद्यालयांचा युक्तिवाद आहे. खासगी महाविद्यालयांना आवरण्याबाबत राज्य सरकारही फारशी उत्सुकता दाखवित नसल्याने वैद्यकीय प्रवेशांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करणे भाग आहे.    
आयुर्वेद, होमिओपॅथीही ‘नीट’मधून
राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील ‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’सह आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिग आदी अन्य अभ्यासक्रमांचे प्रवेशही नीटमधूनच होणार आहेत. याआधी हे सर्व प्रवेश ‘एमएचटी-सीईटी’तूनच होत असत. पण, ‘आता सरकारी महाविद्यालयातील एमबीबीएसपासून बीएससी-नर्सिगपर्यंतच्या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश नीटमधूनच होतील. या संबंधात आम्ही लवकरच जाहीर निवेदन काढू,’ अशी माहिती वैद्यकीय संचालनालयाचे डॉ. मानसिंग पवार यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा