मुंबई: विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे राज्य सरकारच्या DigiPravesh या अॅपवर नोंदणी करून मिळणाऱ्या क्यूआर कोड आधारेच मंत्रालयात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काहीतरी कामाचे निमित्त करून मंत्रालयात येणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांनाही यापुढे मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही.
मंत्रालयाची सुरक्षा आणि दररोज येणारे हजारो अभ्यागत व वाहनांना मंत्रालयात प्रवेश देण्यासंदर्भात सरकारने मंत्रालय सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत चेहरा पडताळणीच्या आधारे लोकांना मंत्रालयात प्रवेश देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आता क्षेत्रीय अधिकारी आणि अभ्यागतांना अॅप आधारित व्यवस्थेच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी Digi Pravesh हा अॅप विकसित करण्यात आला आहे.
सर्वसाधारण अभ्यागतांसाठी…
मंत्रालयात येणाऱ्या इतर सर्वसाधारण अभ्यागतांना दुपारी २ वाजल्यानंतर प्रवेश देण्यात येईल. अशा प्रवेशासाठी त्यांना अॅपवर प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळविता येईल. त्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड असे शासनमान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल. अभ्यागतांना मंत्रालयाच्या ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे, केवळ त्यांना दिलेल्या वेळेत आणि अनुज्ञेय असलेल्या मजल्यावरच प्रवेश मिळेल. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास अभ्यागतावर कारवाई केली जाईल.
मंत्रालयात प्रवेशासाठी…
● राज्यभरातील क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामासाठी मंत्रालयात प्रवेश हवा असल्यास, त्यांना DigiPravesh या ऑनलाइन अॅप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे.
● यासाठी DigiPravesh अॅपद्वारे आपली नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यूआर कोड आधारे मंत्रालयाबाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशासाठी आरएफआयडी ( RFID) कार्ड वितरित करण्यात येईल. या कार्डच्या आधारे सुरक्षाविषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल.
● अभ्यागतांना मिळालेले प्रवेश ओळखपत्र परिधान करणे व मंत्रालयातून बाहेर जाताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक राहील.
● विभागीय कार्यालयीतील अधिकारी व कर्मचारी यांना कामानिमित्त मंत्रालयात प्रवेश हवा असल्यास त्यांनाही अॅपवर नोंदणी करणे बंधनकार करण्यात आले असून, त्यांना ज्या विभागामध्ये कामानिमित्त भेट द्यावयाची आहे त्या विभागाच्या संमतीने मंत्रालयात सकाळी १० वाजल्यापासून प्रवेश दिला जाईल.
● क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना बैठकीसाठी मंत्रालयात आमंत्रित केले असल्यास बैठक पत्र, सूचना बैठकीच्या किमान एक दिवस अगोदर अॅपवर अपलोड करणे बंधनकारक असेल. तसेच बैठकीसाठी संबंधित विभागांनी जास्तीत जास्त दोन अधिकाऱ्यांना पाठवावे.
● बैठक किंवा सुनावणीसाठी अधिकारी, लोकांना किंवा वकिलांना न बोलवता ऑनलाइन सुनावणी घ्यावी असे गृह विभागाच्या आदेशात नमूद केले आहे.