आपल्या घरातील टीव्ही, फ्रीज, पंखा अशा वस्तू बिघडल्या की त्या दुरुस्त करणाऱ्यांची शोधाशोध सुरू होते. आयत्या वेळेस नंबर्स सापडत नाही आणि आपला गोंधळ उडतो. अशा वेळी आपण दूरध्वनी क्रमांक पुरविणाऱ्या सेवांची मदत घेतो. मात्र तेथे आपण एकदा संपर्क साधला की आपल्या परिसरातील किमान दहा जणांचे फोन आपल्याला येतात. या सर्व त्रासापासून सुटका करणारे व आपल्याला सेवा पुरविणाऱ्या व्यक्तीपर्यंत योग्य प्रकारे पोहोचविणारे एक संकेतस्थळ तीन मराठी तरुणांनी सुरू केले आहे.

खरे तर गरज ही शोधाची जननी मानली जाते. मात्र नेमका यापेक्षा उलट विचार करून अ‍ॅपलचे जनक स्टिव्ह जॉब्ज यांनी आयफोनची निर्मिती केली. त्याचाच आदर्श ठेवून सुशांत दरेकर या तरुणाने सेवा पुरविणारे आणि ग्राहक यांच्यामध्ये दुवा होण्याचा निर्णय घेतला. यासाठी सामान्य दूरध्वनी क्रमांक पुरविणाऱ्या सेवांसारखे त्याला करायचे नव्हते. यामुळे त्याने एक संकेतस्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही कल्पना त्याने आपले मित्र अमित बरावकर आणि ऋषभ गलाटगेकर यांना सांगितली. त्यांनाही ही कल्पना आवडली आणि या तिघांच्या प्रयत्नातून http://www.aarigo.com  या संकेतस्थळाचा जन्म झाला. या संकेतस्थळावर तुम्हाला तुमच्या विभागात कपडे ड्रायक्लीनिंग करून देणाऱ्यांपासून ते पेस्ट कंट्रोलची सेवा कोण पुरवितात याची सर्व माहिती मिळणार आहे. केवळ माहितीच नाही तर तुम्ही तुमच्या भागातील अशी सेवा पुरविणाऱ्या दोन किंवा त्याहून अधिक पुरवठादारांची माहिती दिली जाते. तसेच प्रत्येक जण किती दर आकारतो याची तुलना करण्याचीही मुभा असते. तुम्हाला पाहिजे त्या सेवा पुरवठादाराशी संकेतस्थळाच्या माध्यमातून संपर्क साधू शकता. यासाठी तुम्हाला एक रुपयाही अतिरिक्त खर्च करण्याची गरज नसते. कंपनी सेवा पुरवठादारांकडून काही रक्कम घेते यामुळेच ग्राहकांना ही सेवा अगदी मोफत मिळत असल्याचे सुशांत सांगतो. सध्या ही सेवा बृहन्मुंबई व ठाणे आणि उपनगरांमध्ये उपलब्ध आहे. भविष्यात ही सेवा दिल्ली, बेंगळुरू अशा शहरांमध्येही सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या संकेतस्थळावर ३०० हून अधिक सेवा पुरवठादारांच्या नोंदणी आहेत. यामुळे सेवा पुरवठादारांना थेट ग्राहकांपर्यंत व ग्राहकांना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचता येत असल्याचेही सुशांत सांगतो. सुशांतने लंडन येथील वेल्स विद्यापीठातून एमबीए केले आहे तर अमितने मुंबईतून बी.टेक्. केले आहे. ऋषभने संगणक विज्ञान शाखेत शिक्षण घेतले आहे.