‘केमिस्ट असोसिएशन’च्या जागरूकतेमुळे प्रकार उघडकीस

ऑनलाइन औषधविक्रीला बंदी असतानाही मात्र काही संकेतस्थळांवरून औषधांची सर्रास विक्री होत असून यामध्ये गर्भपाताच्या (एमटीपी) गोळ्यांची बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याचे केमिस्ट असोसिएशनने पुराव्यासह उघडकीस आणले आहे.

ऑनलाइन औषधविक्रीच्या परिणामांचे संभाव्य धोके लक्षात घेऊन अशा प्रकारच्या विक्रीला सध्या राज्यामध्ये र्निबध घालण्यात आले आहेत. मात्र ही बंदी झुगारून www.omsi.in, m.medlife.com यासारखी संकेतस्थळे सर्रासपणे औषधांची विक्री करत आहेत. त्यातही या संकेतस्थळावरून गर्भपाताच्या (एमटीपी) गोळ्या सहजपणे उपलब्ध होत असल्याचे पुणे केमिस्ट असोसिएशनचे सचिव विजय चंगेडिया यांनी पुराव्यासह अन्न व औषध प्रशासनाच्या लक्षात आणून दिले आहे. ‘माझ्या दुकानात आलेल्या तरुणाने गर्भपाताच्या गोळ्यांची मागणी केली. त्याला नकार दिल्यानंतर त्याच्याकडूनच ऑनलाइन या गोळ्या मिळत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा याचा छडा लावण्यासाठी मी या संकेतस्थळावरून गर्भपाताच्या गोळ्या मागविल्या. कोणत्याही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय दोन दिवसांमध्ये या गोळ्या माझ्या घरी आल्या, तेव्हा मला हे पटले. स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी म्हणून प्रतिबंधित असणाऱ्या गर्भपाताच्या गोळ्या सर्रासपणे उपलब्ध व्हायला लागल्या तर याचे गंभीर परिणाम दिसायला वेळ लागणार नाही, असे विजय चंगेडिया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

‘मेडलाइफ’ या संकेतस्थळावर तर हव्या त्या औषधांची नावे पेपरवर लिहून पाठवायची आणि ती औषधे तुम्हाला घरपोच मिळतात. यामध्ये अगदी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय न दिली जाणारी नार्कोटिक औषधेही पुरविली जातात. त्यामुळे हे घातक असून याला वेळीच रोखणे गरजेचे आहे, असेही चंगेडिया यांनी व्यक्त केले. ऑनलाइनच्या माध्यमातून अवैधरीत्या गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होत असल्याची तक्रार असोसिशएनने अनेकदा अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. मात्र प्रशासनाने कोणतीच कारवाई केलेली नाही. तेव्हा आता तरी कारवाई करावी, असे चंगेडिया यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष!

  • विजय चंगेडियांनी उघडकीस आणलेला प्रकारही अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्ल्वी दराडे यांच्यासमोर पुराव्यासह सादर केला आहे. त्यांनाही आम्ही कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर गोष्टींवर अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने ऑनलाइन औषध विक्रेत्यांचे फावत आहे, असे महाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
  • तत्कालिक अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्याकडे जवळपास २०१६ पासून ऑनलाइनच्या माध्यमातून अवैधरीतीने होणाऱ्या औषध विक्रीविरोधात अनेकदा तक्रार करत आलो आहोत. मात्र आता दोन वर्षे होत आली तरी कोणतीही कारवाई झालेली नाही.

Story img Loader