मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून अर्थसहाय्य घेणाऱ्या महिला बचत गटांच्या वस्तू आता ऑनलाईन पद्धतीनेही विकत घेता येणार आहेत. महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने आता https://shgeshop.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नवनवीन उत्पादनांची यात भर पडत आहे. यातून अधिकाधिक महिलांना रोजगार मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरांतील तब्बल आठ हजारांहून अधिक बचत गटांना अर्थसहाय्य केले आहे. प्रत्येक बचत गटात दहा महिला सदस्य आहेत. या सर्व महिलांना त्यांचे घरकाम सांभाळून कुटुंबासाठी हातभार लावता यावा यासाठी महानगरपालिकेने विविध वस्तू, उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच त्यांना अर्थसहाय्यही दिले आहे.

मुंबई महानगरातील आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांना रोजगार मिळावा, महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यातून महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी नियोजन विभागाकडून मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांत महिला बचत गटांतील सदस्य महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना विविध प्रदर्शने, व्यापारी संकुल, यात्रा, उत्सवांमध्ये विक्री करण्याची संधी मिळवून दिली आहे. विविध दुकानांच्या माध्यमातूनही या महिलांची उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करण्यात येत आहेत.

हेही वाचा >>> घरे देण्याचे आमिष दाखवून ६० महिलांची फसवणूक; सुमारे अडीच कोटींच्या फसवणुकीप्रकरणी दोन भावांविरोधात गुन्हा दाखल

होतकरू मराठी मुलांनी नव उद्योगाच्या (स्टार्ट अप) माध्यमातून https://shgeshop.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर विविध ग्राहकोपयोगी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांतील महिलांना याच मुलांच्या माध्यमातून ऑनलाईन ऑर्डर कशी स्वीकारावी, त्यानंतर ग्राहकांना वस्तू कशी विकावी, ऑननाईन व्यवहार कसा करावा, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

हेही वाचा >>> सहा हजारांहून अधिक कामगारांनी गिरवले सुरक्षेचे धडे, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उपक्रम

पहिल्या टप्प्यात ५० बचत गटांची निवड

ऑनलाईन व्यवसायासाठी महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने बचत गटांची वर्गवारी केली आहे. त्यानुसार ज्या बचत गटांची उत्पादने (खाद्यपदार्थ वगळून) टिकावू असतील, अशा बचत गटांना ऑनलाईन विक्रीसाठी पुढे केले आहे. पुढील टप्प्यांत साधारण महिनाभर टिकू शकतील, असे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या बचत गटांनाही ऑनलाईन विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.

ही उत्पादने मिळताहेत ऑनलाईन बचत गटांनी तयार केलेले उटणे, अगरबत्ती, जुट बॅग्ज, इमिटेशन ज्वेलरी, मोत्याचे दागिने, साड्या, रांगोळी, परफ्यूम, ड्रेस, लेडीज कुर्तीज्, फॅन्सी कँडल्स, विविध प्रकारची आकर्षक तोरण, दिवाळीसाठी कंदील, आकर्षक पणत्या, बांबूच्या आकर्षक वस्तू, तसेच सजावटीचे आकर्षक साहित्य आदी सध्या ऑनलाईन उपलब्ध आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online sale of products of self help groups fund given by mumbai municipal corporation mumbai print news zws
Show comments