विविध ई-व्यापार संकेतस्थळांवर सुरू असलेल्या दिवाळीपूर्व खरेदी महोत्सवातील खरेदीत यंदा ९१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे खरेदी करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याचबरोबर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वाधिक मागणी ही मोबाइल फोन्सनाच आहे. नुकताच भारतात दाखल झालेल्या आयफोन ८ साठी बडय़ा ऑनलाइन कंपन्यांनी विशेष सवलत योजना आणल्या आहेत. याशिवाय ‘नो कॉस्ट ईएमआय’सारख्या योजनांमुळे ग्राहक मोठय़ा प्रमाणावर आकर्षित होत आहे.

दिवाळीपूर्वी खरेदी करण्यासाठी विविध पर्याय शोधणाऱ्या बहुतांश लोकांनी या वर्षी कपडे, मोबाइल, टीव्ही, फ्रिज, एसी या सर्व गोष्टींसाठी ऑनलाइन बाजारात धाव घेतली आहे. या ऑनलाइन बाजारपेठेमध्ये सध्या दिवाळीपूर्व सवलत योजना सुरू आहेत. यात ग्राहकांना अगदी ६० टक्क्यांपर्यंतही सवलत मिळत आहे. याशिवाय पैसे परताव्यासारख्या योजनांचाही लाभ मिळत आहे. ज्या ग्राहकांना एकरकमी पैसे देणे शक्य होणार नाही अशा ग्राहकांसाठी ‘नो कॉस्ट ईएमआय’ची सुविधाही या कंपन्यांनी सुरू केली आहे. परिणामी ग्राहकांना पैसे देण्यासाठी मुबलक वेळ मिळतो आहे. या सर्व गोष्टींच्या प्रभावामुळे यंदा ऑनलाइन खरेदीच्या प्रमाणात ९१ टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर दिवाळीच्या दिवसांमध्ये हे खरेदीचे प्रमाण १४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या वर्षी एक विशेष बाब नोंदविण्यात आली आहे ती म्हणजे सप्टेंबपर्यंतच्या ई-व्यापार व्यवहारांमध्ये १८ टक्के व्यवहार हे पर्यटन संकेतस्थळांवर झाले आहेत. यामुळे दिवाळीच्या पर्यटनाचे नियोजनही ऑनलाइन करण्यात वाढ झाली आहे. केवळ स्मार्टफोनवरील सवलती नव्हे तर इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे ऑनलाइन खरेदीच्या व्यवहारांमध्ये वाढ दिसत असल्याचे क्रीटा इंडियाचे महाव्यवस्थापक सिद्धार्थ दाभाडे यांनी सांगितले. तसेच ऑनलाइन व्यवहारांतील सुरक्षितता वाढल्यामुळेही लोकांचा या व्यवहारांवरील विश्वास वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.

गुगल सर्चमध्ये वाढ

या वर्षीच्या दिवाळी खरेदीच्या गुगल सर्चमध्ये ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘दिवाळी’ हा शब्द देऊन गुगलमध्ये सर्च करणाऱ्यांची संख्या ऑक्टोबर महिन्यात २१ लाख ९६ हजारांहून अधिक असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. १७ कोटी ४० हजार गुगल पानांवर ‘दिवाळी’ हा कळशब्द म्हणून वापरण्यात आला आहे. या कळशब्दाची शोध किंमत एक लाख ३५ हजार रुपये इतकी आहे; म्हणजे दिवाळी हा शब्द सर्च केल्यावर गुगलवर पहिल्या तीन ज्या जाहिराती झळकतात त्याच्या एक हजार क्लिकसाठी आकारला जाणारा हा दर आहे. तर ‘दिवाळी’ या कळशब्दासाठी जाहिरातींचा दर हा २३.६२ रुपये प्रति क्लिक इतका आहे. या वर्षी गुगलमध्ये ‘दिवाळी फटाके ऑनलाइन’, ‘दिवाळी पणत्या ऑनलाइन’ आणि ‘दिवाळी भेटवस्तू ऑनलाइन’ या तीन प्रकारांची माहिती मिळवण्यासाठी सर्वाधिक गुगल सर्च करण्यात आले आहे. दिवाळीदरम्यान गुगल अ‍ॅडवर्डच्या माध्यमातून जाहिरातींवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या कंपन्यांमध्ये अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, शॉपक्लूज या कंपन्यांचा समावेश आहे.