मुंबई : ऑनलाईन विनगेम खेळात गणितीय कौशल्याचा समावेश आहे, संधीचा नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने हा ऑनलाइन विनगेम विकसित करणाऱ्यासहा दोघांना दिलासा दिला. तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द केला.
प्राथमिक माहिती अहवालाचा (एफआयआर) विचार करता याचिकाकर्त्यांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. परंतु, त्यानंतरही याचिकाकर्त्यांना खटल्याला सामोरे जावे लागले तर ते कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग होईल, असे निरीक्षण न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची याचिका मान्य करताना नोंदवले.
हेही वाचा – मुंबई: ‘एमएमएस’ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मुंबई विद्यापीठामधील आयडॉलचा निर्णय
कोरेगाव पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी ऑनलाइन विनगेम विकसित करणारा अक्षय मटकर (२६) आणि सतीश बोतलजी (४५) यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांनी छापा टाकून या दोघांवर कारवाई केली होती. जुगार खेळणाऱ्या व्यक्तीला वॉरंटशिवाय अटक करण्याच्या तरतुदीअंतर्गत पोलिसांनी बोतलजी याला अटक केली होती. संगणकाच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या क्रमांकाच्या आधारे बेकायदेशीरपणे जुगार खेळला जात असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला होता.
खेळात सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला एकापेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. या प्रश्नांची उत्तरे संख्याधारित असतात. प्रत्येक आकड्याचे मूल्य असते आणि ते प्रत्येक प्रश्नात बदलते. तसेच स्पर्धकाला आकड्यांची योग्य ती गणना केल्यानंतर उत्तराचा पर्याय निवडावा लागतो. विविध प्रश्नांची एकत्रित उत्तरे दिल्यानंतर, गुणांची गोळाबेरीज केली जाते आणि त्यानंतर विजेता घोषित केला जातो. प्रत्येक प्रश्नमंजुषामध्ये दोन प्रश्न असतात आणि ते ३० सेकंदात सोडवायचे असतात.
न्यायालयाने या बाबी विचारात घेतल्या. खेळाच्या नियमानुसार, सहभागी होणाऱ्याला वेगवेगळ्या संयोजनांवर आधारित गणितीय प्रश्नमंजुषा सोडवणे आवश्यक आहे आणि उत्तरे एकापेक्षा अधिक प्रश्नांच्या स्वरुपात द्यावी लागतात. खेळासंदर्भातील पुस्तिकात दिलेली उदाहरणे, तसेच विविध प्रश्नमंजुषांच्या उत्तरांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या नमुना उत्तरपत्रिकेद्वारे गुण मोजले जातात. या सगळ्यांचा विचार केला असता हा ऑनलाइन खेळ संधीचा खेळ नाही, तर गणिती कौशल्याचा आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले. या खेळात कौशल्याव्यतिरिक्त, निरीक्षण आणि गणितीय समीकरणे कालबद्ध पद्धतीने सोडविण्याची क्षमता आवश्यक असून त्यासाठी निश्चितपणे कौशल्य आवश्यक आहे, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देताना प्रामुख्याने नमूद केले.