मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीसाठीच्या सोडतपूर्व प्रक्रियेला अर्थात अर्जविक्री-स्वीकृतीला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज अनामत रक्कमेसह सादर झाले आहेत. हा प्रतिसाद पाहता सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा मंडळाचा विचार आहे. यावर याच आठवड्यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मुदतवाढ मिळाल्यास १३ सप्टेंबरची सोडतही पुढे जाईल.
मुंबई मंडळाच्या पवई, विक्रोळी, गोरेगाव, जूहू, ताडदेव, दादर, वडाळा, वरळी अशा अनेक ठिकाणच्या २०३० घरांसाठी मंडळाने सोडत जाहीर केली आहे. त्यानुसार ९ ऑगस्टपासून अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात झाली. पण यावेळी मात्र इच्छुकांनी सोडतीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अर्जविक्री-स्वीकृतीला प्रतिसादच मिळाला नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत (सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत) २०३० घरांसाठी २२ हजार ४०० इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. तर यातील केवळ १४ हजार ८३९ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत.
हेही वाचा >>>वित्त विभागाचा आक्षेप; तरीही मुंबै बँकेला भूखंड, जाहिरातीविना भूखंड वाटप झाल्याचे उघड
आता अर्जविक्री-स्वीकृतीसाठी केवळ ९ दिवसांचा कालवाधी शिल्लक असून ५० हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे मंडळाकडून अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांना विचारले असता याबाबत म्हाडा उपाध्यक्ष अंतिम निर्णय घेतील असे सांगितले.
मुदत अत्यंत कमी
अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस किमान ४५ दिवसांची मुदत अपेक्षित असते. मात्र आचारसंहिता लागण्याच्या शक्यतेने मंडळाने यावेळी केवळ २६ दिवसांचीच मुदत दिली. ही मुदत अत्यंत कमी असल्याचे बोलले जात आहे.
© The Indian Express (P) Ltd