चीन, जपान, अमेरिका, ब्राझील आदी देशांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा करोनाची लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्रामध्ये आठवडाभरात अवघे १६ करोनाबाधित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या तरी करोनाचा नवा विषाणू आपल्याकडे आला नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, असे असले तरीही योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ञांकडून देण्यात येत आहे.

विश्लेषण: चीनमध्ये थैमान घालणाऱ्या BF-7 Variant चे भारतात ४ रुग्ण; संसर्गाची लक्षणं कोणती? लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग, कारण…

चीनमध्ये करोनाचा ‘बीएफ ७’ हा उपप्रकार अधिक वेगाने पसरत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर करोना रुग्ण वाढत असताना राज्यातील करोनास्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याचे मुख्यमंत्री व आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अवलोकन अहवालावरून महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मागील आवड्यात राज्यात अवघे १६ करोनाबाधित रुग्ण रूग्णालयात दाखल झाले आहेत. गेल्या आठवड्यात राज्यात करोना रुग्णांची संख्या त्यापूर्वीच्या आठवडयाच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. करोनाविषयक चाचण्या सकारात्मक (पॉझिटिव्ह) येण्याचे शेकडा प्रमाण ०. २९ एवढे कमी आहे. संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे करोनाच्या या उपप्रकारामुळे भिती बाळगण्याची गरज नसली तरी आवश्यक ती दक्षता घेण्याची गरज आहे. करोनाची बाधा होऊ नये यासाठी काळजी घेण्याबरोबरच लसीकरणावर भर द्यावा, असा सल्ला तज्ञांकडून देण्यात येत आहे. तसेच वरिष्ठ नागरिक आणि अतिजोखमीचे आजार असलेल्या नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर करावा, असे आवाहन तज्ञांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader