चीनसह अनेक देशांमध्ये करोनाच्या नवा विषाणूचा मोठय़ा प्रमाणात प्रसार होत आहे. यामुळे करोना लसीकरणावर पुन्हा भर देण्यात येत आहे. मुंबईसह राज्यात नागरिकांनी करोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्या तरी वर्धक मात्रा घेण्याकडे अनेकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे आता नागरिकांना वर्धक मात्रा घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. मात्र राज्याकडे फक्त १७ लाख, तर मुंबई महापालिकेकडे ६ हजार लशींच्या मात्रा शिल्लक आहेत. त्याच वेळी राज्यात सहा कोटी ५२ लाख ७४ हजारांहून अधिक, तर मुंबईत ८१ लाख ८० हजारांहून अधिक नागरिक वर्धक मात्रेपासून वंचित आहेत. ही आकडेवारी लक्षात घेता वर्धक मात्रा देण्यासाठी लसीची चणचण भासण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आतापर्यंत आठ कोटी ८१ लाख ९४ हजार ३१६ नागरिकांनी करोना लसीची पहिली मात्रा घेतली आहे. तर सात कोटी ३३ लाख ४० हजार ५७७ नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा आणि ८० लाख ६६ हजार ५४० नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. तसेच मुंबईमध्ये एक कोटी चार लाख ३१ हजार ६३० नागरिकांनी लसीची पहिली मात्रा, ९३ लाख ८३ हजार १९८ नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा, तर फक्त १२ लाख २ हजार ६१८ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे.
करोनाचा नवा विषाणू ओमिक्रोनपेक्षा अधिक वेगाने पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने नागरिकांचा पुन्हा लसीकरण करण्याकडे ओढा वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारकडे फक्त १७ लाख लशींचा साठा उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांनी सांगितले. तर मुंबईमध्ये फक्त सहा हजार लशींचा साठा उपलब्ध आहे. मुंबईमध्ये कोव्हॅक्सीन लसीच्या सहा हजार मात्रा उपलब्ध आहेत. कोव्हिशील्ड आणि लहान मुलांना देण्यात येणाऱ्या कोबरेवॅक्स या लशींची एकही मात्रा शिल्लक नाही, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
मुंबईत एक कोटी ३० लाख नागरिकांपैकी ९३ लाख ८३ हजार १९८ नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. १२ लाख २ हजार ६१८ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली. ८१ लाख ८० हजार ५८० नागरिक वर्धक मात्रेपासून वंचित आहेत.महाराष्ट्रात सात कोटी ३३ लाख ४० हजार ५७७ नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. ८० लाख ६६ हजार ५४० नागरिकांनी वर्धक मात्र घेतली. सहा कोटी ५२ लाख ७४ हजार ३७ नागरिक वर्धक मात्रेपासून वंचित आहेत.
मुंबई महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू आहे. तसेच आम्ही राज्य सरकारकडे लशींचा साठा पाठवण्याची मागणी केली आहे. मात्र त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. परंतु आम्ही सर्वाना लस देण्यासाठी अटोकाट प्रयत्न करीत आहोत. – डॉ. मंगला गोमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग, मुंबई महापालिका