गणेशोत्सवापूर्वी मुंबई शहरातील खड्डे बुजवून गणरायाचे आगमन निर्विघ्न करण्याचे दावे करणारी महापालिका गणेश विसर्जनाची वेळ आली तरीही खड्डय़ांचा ताळेबंद मांडण्यातच गुंतली आहे. सोमवारच्या गणेश विसर्जनाच्या तयारीची माहिती देताना महापालिकेने शहरात केवळ अठराच खड्डे असल्याचे शनिवारी जाहीर केले! पालिकेचे हे अजब तर्कट त्यांच्याच संकेतस्थळावरून खोडून काढले जात असल्याने यंदा विसर्जनाची वाटही खडतरच असल्याचे दिसून येत आहे.
गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यात येतील, असा दावा करणाऱ्या पालिकेने १८ ते २३ ऑगस्टदरम्यान विसर्जन मिरवणुकींच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवून त्यांची तपासणीही केली होती. मात्र गणेशोत्सवादरम्यान झालेल्या पावसाने खड्डय़ांतील डांबर पुन्हा निघाले. मात्र, विसजर्नाच्या तयारीबाबत पालिकेने कळवलेल्या माहितीत शहरातील विविध रस्त्यांवर ४४२ खड्डे निर्माण झाले होते, असे म्हटले आहे. त्यापैकी ४२४ खड्डे बुजवण्यात आले असून उर्वरित खड्डे २४ तासांत बुजवण्यात येतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पालिकेचा हा दावा बृहन्मुंबई सार्वजनिक समन्वय समितीने फेटाळून लावला आहे. गिरगाव चौपाटीकडे येणारे रस्ते, चौक यांच्यावर पुन्हा खड्डे दिसत आहेत, असे गणेशोत्सव सार्वजनिक समन्वय समितीचे प्रतिनिधी अनंत बेडेकर म्हणाले.
संकेतस्थळावर १२१८ खड्डे
पालिकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत शहरात १३५०४ खड्डे नोंदवण्यात आले व त्यातील १२३८६ खड्डे बुजवण्यात आले. याचाच अर्थ तब्बल १२१८ खड्डे अजूनही शिल्लक आहेत.  नाना चौक, ग्रॅण्ट रोड, अंधेरी, बोरिवली, घाटकोपर, मुलुंड या भागांत सर्वाधिक खड्डे असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा