शैलजा तिवले

मुंबई आणि महानगर प्रदेशात एकीकडे रुग्णालयात करोनाबाधित रुग्ण दाखल झाल्यापासून पहिल्या चोवीस तासांत होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अवघ्या दोन टक्क्य़ांवर आले आहे. मात्र दुसरीकडे अजूनही लक्षणे दिसूनसुद्धा रुग्ण उशिराने दाखल होत आहेत, असे निरीक्षण मृत्यू लेखापरीक्षण समितीने रुग्णालयांतील मृतांच्या अभ्यासातून नोंदविले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असूनही दर आठवडय़ाच्या मृत्यू दराचे प्रमाण दोन टक्क्य़ांपर्यंत आहे. मृत्युदर आणखी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील करोना उपचार करणाऱ्या रुग्णालयांत सप्टेंबर ते ऑक्टोबर याकाळात झालेल्या मृतांचे परीक्षण मृत्यू लेखापरीक्षण समितीने यादृच्छिक पद्धतीने केले. यात मृत्यू मागील कारणे, दिलेले उपचार, दाखल झाल्यानंतर किती दिवसांत मृत्यू इत्यादी बाबी तपासल्या गेल्या.

या अहवालानुसार, रुग्णालयात दोन टक्के रुग्णांचा मृत्यू दाखल झाल्यानंतर चोवीस तासांत झाला आहे. मुंबईत ऑगस्टमध्ये हे प्रमाण जवळपास ३० टक्के होते. २९ टक्के रुग्णांचा मृत्यू आठवडाभरात, तर ३१ टक्के रुग्णांचा मृत्यू १५ दिवसांत झाल्याचे नोंदले. महिनाभराच्या उपचारानंतर सहा टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

यातील जवळपास ७८ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याआधी सात दिवसात संसर्गाची बाधा झाली होती. तर १९ टक्के रुग्णांना लक्षणे दिसूनही आठ दिवस उशिराने उपचारासाठी दाखल झाले होते. मृतांमधील केवळ २ टक्के रुग्ण हे लक्षणे दिसण्याच्या दिवशी दाखल झाले होते. मृतांपैकी ६५ टक्के रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी रुग्णालयात दाखल होताना खालावलेली होती, तर १६ टक्के रुग्णांमध्ये दाखल होण्याच्या वेळेस ऑक्सिजनची पातळी ८५ टक्क्य़ांहूनही कमी झाली होती. ऑक्सिजनची पातळी स्थिर सर्वसाधारण असूनही ३४ टक्के मृत्यू झाल्याचे नोंदले आहे. सर्व रुग्णांना योग्य उपचार दिल्याचे या अहवालात मांडले असून जवळपास ८६ टक्के रुग्णांना रेमडेसिवीर, १३ टक्के फॅविपिरावीर आणि ५० टक्के रुग्णांना टोसीलीझुमॅब दिले गेले होते.

* या अभ्यासात ३९ टक्के मुंबई आणि ६१ टक्के महानगरप्रदेशातील मृतांचा समावेश आहे.

* मृतांपैकी ३३ टक्के ४६ ते ६० वयोगटातील असून ५० टक्के जणांना उच्च रक्तदाब, तर ३२ टक्के जणांना  मधुमेहाचा त्रास होता.

* यातील ९६ टक्के रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता, तर ५७ टक्के रुग्णांना ताप आणि ५६ टक्के रुग्णांना खोकला ही प्रमुख लक्षणे होती.

लक्षणे असून, त्रास झाला तरी उशिराने उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. रुग्णालयात उपचार योग्य पद्धतीने दिले जात आहेत. त्यामुळे करोना संसर्गामुळे श्वसनावर परिणाम झाल्याने लगेचच दगावणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. आता बहुतांश मृत्यू हे उपचार घेत असताना इतर सहव्याधी किंवा अन्य संसर्गामुळे होत आहेत. ऑक्सिजनची पातळी खालावल्यानंतर रुग्ण रुग्णालयात येत असल्याचे दिसून येते. उपचारांची दिशा आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे रुग्णांनी लक्षणे दिसल्यावर, निदान वेळेत करून लवकर उपचार सुरू करावेत.

– डॉ. अविनाश सुपे, मृत्यू    लेखापरीक्षण विभागाचे प्रमुख

Story img Loader