लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नालेसफाईची कामे हाती घेतली आहेत. नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याबाबत महानगरपालिकेने जाहीर केलेली आकडेवारी खोटी असून, आतापर्यंत नालेसफाईची केवळ २५ ते ३० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. नालेसफाईच्या कामात महानगपालिकेकडून निष्काळजीपणा केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पश्चिम उपनगरातील साऊथ एव्हेन्यू नगर – गझदर बांध नाला, पवन हंस नाला व एस.एन.डी.टी. नाला, गजधर बांध पंपिंग स्टेशन, मिलिनेयम क्लबजवळील इर्ला नाला, मोगरा नाला, मेघवाडी नाला या नाल्यांची शेलार यांनी शुक्रवारी पाहणी केली. ‘राहुल नगर नाल्याच्या सफाईचे काम झालेले नाही. गझदरबंध नाल्यात आजच जेसीबी उतरवून गाळाचा अंदाज घेण्यात आला आहे. तर गझदरबंध पंपिंग स्टेशनसमोर गाळाचे ढीग साचलेले आहेत. एसएनडीटी नाल्याचे कामही नुकतेच सुरू झाले असून, बेस्ट वसाहत नाल्यात वनस्पती उगवलेल्या दिसत आहे. प्रत्यक्षात नालेसफाईची केवळ २५ ते ३० टक्के कामे झाली असून, ७० ते ८० टक्के नालेसफाई झाल्याचा महानगरपालिकेचा दावा खोटा आहे’, असे शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा… मुंबई: प्रवाशाचा मोबाइल चोरणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक

गेल्या अनेक वर्षांपासून पावसाच्या पाण्याचा नीट निचरा व्हावा ही मुंबईकरांची अपेक्षा आहे. मात्र गेली २५ वर्षे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. महानगरपालिका कंत्राटदारांच्या जीवावर सर्व दावे करीत आहे. नालेसफाईच्या २८० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कामांसाठी नियुक्त केलेले कंत्राटदार हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असून, त्यांच्यावर आमचा विश्वास नाही, असेही ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्यावरही शेलार यांनी टीका केली.

Story img Loader