मुंबई : बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाच्या ताफ्यात स्वमालकीच्या केवळ ३५ टक्के बसगाड्या शिल्लक आहेत. परिणामी, भविष्यात अपुऱ्या बसगाड्या, फेऱ्यांची कमी वारंवारता, नादुरूस्त बस यामुळे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. येत्या काळात बेस्ट बसचा स्वमालकीचा ताफा वाढला नाही, तर प्रवाशांना मिळणारी स्वस्तातील सुविधा बंद होण्याची शक्यता आहे.

बेस्ट उपक्रमातील १५ वर्षे आयुर्मान पूर्ण झालेल्या बसगाड्या नुकत्याच भंगारात काढण्यात आल्या. यात पाच हजार क्रमांकाची मालिका असलेली एकुलती एक बस बाद करून तीही भंगारात काढण्यात आली. त्यामुळे पाच हजार क्रमाकाच्या मालिकेच्या गाड्यांचे पर्व संपले आहे. त्याचबरोबर बेस्टमधील स्वमालकीचा बस ताफा झपाट्याने कमी होतो आहे. परिणामी, प्रवाशांना बसची वाट बघत ताटकळावे लागत आहे.

हेही वाचा >>>Hit and Run: मिहीर शाह याच्या अटकेनंतर जितेंद्र आव्हाडांचा सवाल, “रक्ताच्या नमुन्यांत ६० तासांनी पोलीस…”

बेस्टकडे किती बसगाड्या

सप्टेंबर २०२३ पर्यंत बेस्टकडे स्वमालकीच्या १,५०० बस होत्या. एप्रिल २०२४ पर्यंत त्यांची संख्या १,१०० इतकी झाली. तर, आता १,०९३ स्वमालकीच्या बस शिल्लक आहेत. सध्या बेस्टमध्ये एकूण ३,१५३ बस असून यामध्ये सुमारे २,०६० बस भाडेतत्त्वारील आहेत. साधारणपणे ३५ टक्के स्वमालकीच्या आणि ६५ टक्के भाडेतत्त्ववरील बस आहेत. स्वमालकीच्या बसची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

गेल्या ९ महिन्यांपासून खुल्या बसची निविदा प्रक्रिया रखडली

मुंबई दर्शनासाठी बेस्ट उपक्रमाच्या खुल्या बस (ओपन बस) होत्या. मात्र, ऑक्टोबर २०२३ मध्ये या बस भंगारात काढल्याने तेव्हापासून बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकही खुली बस नाही. त्यामुळे भारतीय संघाची विजयी मिरवणूक बेस्टच्या बसमधून काढता आली नाही. बेस्ट उपक्रमाने सप्टेंबर २०२३ रोजी १० खुल्या बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या ९ महिन्यांपासून खुल्या बसची निविदा प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे पर्यटक, प्रवाशांना खुल्या बसचा आनंद घेता येत नाही.

पहिला टी-२० विश्वचषक २००७ मध्ये जिंकल्यानंतर मुंबईत बेस्टच्या खुल्या बसमधून भारतीय क्रिकेट संघाची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. परंतु गुरुवारी मिरवणुकीसाठी गुजरातहून बस मागविण्यात आली होती. ही बाब बेस्ट उपक्रम आणि मुंबईसाठी अतिशय खेदजनक होती. बेस्टने वेळीच कार्यपद्धतीत बदल केला असता, बेस्टचे आधुनिकीकरण केले असते, तर भारतीय क्रिकेट संघाने बेस्टच्याच अत्याधुनिक खुल्या बसमधून क्रिकेटप्रेमींची मानवंदना स्वीकारली असती. मुंबई आणि बेस्ट उपक्रमासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला असता.- शशांक राव, सरचिटणीस, बेस्ट वर्कर्स युनियन