मुंबई : राज्यात सर्वत्र तापमानात वाढ झाली असताना, पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठाही आटू लागल्याचे चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. जलाशयांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या ४१ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. यामध्ये पुणे विभागात सर्वांत कमी, तर कोकणात जवळपास ५० टक्के साठा शिल्लक आहे. सध्याच्या साठ्यावर पुढील दोन महिन्यांहून अधिक काळ काढायचा असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

उन्हाच्या झळा तसेच तापमानात वाढ झाल्यावर बाष्पीभवनाने जलाशयांमधील साठा आटतो. राज्यात अजून तरी पाण्याचा साठा पुरेसा असला तरी पाण्याचा वाढता वापर आणि बाष्पीभवनामुळे साठा कमी कमी होत चालला आहे. राज्यातील सर्वच धरणांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या ४१.३० टक्के साठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ३५.१६ टक्के साठा होता. राज्यात सध्या कोकण आणि अमरावती या दोन विभागांमध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्क्यांच्या आसपास साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा पाण्याची तेवढी टंचाई जाणवत नाही. यंदा टँकरची संख्या तुलनेत वाढलेली नाही.

मराठवाडाच्या दृष्टीने तेवढीच समाधानकारक बाब म्हणजे जायकवाडी धरणात ४७.३९ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या जलाशयात फक्त १५ टक्के साठा होता. अहिल्यानगरच्या भंडारदरामध्येही ६० टक्क्यांच्या आसपास साठा शिल्लक आहे.

मुंबई, ठाण्याला दिलासा : मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील (जि. ठाणे) भातसा धरणात क्षमतेच्या ४६.७४ टक्के साठा अजून शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा ४१ टक्के इतका होता. तर ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या बारवी धरणात ४३.९८ साठा आहे. तसेच तानसा ३६.४६ टक्के, मोडकसागर धरणात ४३ टक्के साठा शिल्लक आहे.

विभागनिहाय जलसाठा

अमरावती : ५०.०९

कोकण : ४९.९६

नाशिक : ४३.०९

नागपूर : ४१.४९

छत्रपती संभाजीनगर : ४०.४९

पुणे : ३६.३१