मुंबई : राज्यातील विविध रक्तपेढय़ांमध्ये अवघे ५६ हजार युनिट रक्त उपलब्ध असून, उन्हाळय़ाच्या सुट्टीमुळे रक्त संकलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उन्हाळय़ाच्या सुट्टीत (एप्रिल – मे महिन्यात) नागरिक मोठय़ा प्रमाणात गावाला किंवा बाहेरगावी जातात. त्यामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी होते. परिणामी, राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. यंदा उन्हाचा तडाखा वाढल्याने रक्ताची मोठय़ा प्रमाणात गरज भासण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यातील विविध रक्तपेढय़ांमध्ये अवघे ५६ हजार ७०८ युनिट इतके रक्त उपलब्ध आहे. तसेच सध्या दररोज ५ हजार युनिट रक्त लागत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या उपलब्ध असलेले रक्त किमान ११ ते १२ दिवस पुरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> राज्य सरकारला धक्का, मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिका फेटाळली

 ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील सामाजिक, धार्मिक संस्थांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात आले. रक्ताचा मोठय़ा प्रमाणात साठा करून ठेवता येत नाही, त्याऐवजी टप्प्याटप्प्याने रक्त संकलित करण्यावर भर देण्यात येत आहे.

मुंबईमध्ये ६ हजार युनिट रक्त उपलब्ध

 मुंबईमध्ये सध्या ६ हजार २७९ युनिट इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये दररोज किमान ९०० ते १२०० युनिट रक्ताची आवश्यकता आहे. पुढील सुट्टीचा काळ पाहता रक्ताची कमतरता भासण्याची शक्यता आहे. मात्र २३ एप्रिल रोजी अनिरुद्ध बापू यांच्या संप्रदायामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी १० हजार रक्त बाटल्या गोळा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

रक्ताचे आयुष्य ३५ दिवसांचे ..

 शिबिरांच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेल्या रक्तावर विविध प्रक्रिया केल्यानंतर सहा तासांनी ते वापरता येते. त्यानंतर त्या रक्ताचे आयुष्य ३५ दिवसांचे असते. या कालावधीत रक्ताचा वापर न केल्यास ते वाया जाते. त्यामुळे आवश्यकतेनुसार रक्त संकलित करण्यावर भर देण्यात येत असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

उपलब्ध रक्तसाठा

(युनिटमध्ये)

लाल रक्तपेशी –     ५६,७०८

 पांढऱ्या रक्तपेशी – ३५१५

प्लेटलेट –   २८०३ 

प्लाझ्मा –   ९५,४५९