विनायक डिगे
मुंबईसह राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आरोग्य विभागाने सोमवारी आढावा बैठक घेतली. यात अनेक उपायांबरोबरच वर्धक मात्रेचे लसीकरण वाढविण्याची सूचना करण्यात आली असली तरी मुंबईतील सरकारी लसीकरण केंद्रांवर ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोबरेव्हॅक्स’ या लसींचा साठा नसल्यामुळे नागरिकांना वर्धक मात्रेसाठी खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन पदरमोड करावी लागत आहे.
‘कोव्हिशिल्ड’ ही भारतीय बाजारात आलेली पहिलीच लस असल्यामुळे देशातील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी याच लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. २०२२ मध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लसीकरणाकडे दुर्लक्ष झाले. देशभरात करोनाचे रुग्ण वाढत असताना वर्धक मात्रेसाठी विचारणा होऊ लागली आहे. मात्र मुंबईमध्ये कोणत्याच शासकीय लसीकरण केंद्रावर कोव्हिशिल्ड आणि कोबरेव्हॅक्स या लसींचा साठाच उपलब्ध नाही. वर्धक मात्रेसाठी एकतर आधी घेतलेली लस किंवा कोबरेव्हॅक्स हे पर्याय आहेत. मुंबईतील सरकारी लसीकरण केंद्रांवर फक्त ‘कोव्हॅक्सीन’ हीच लस उपलब्ध असल्यामुळे कोव्हिशिल्ड या लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे. कोव्हिशिल्डचा साठा कधी येणार याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयामध्ये जाऊन कोव्हिशिल्डची लस घ्यावी लागत आहे. जे.जे. रुग्णालयामध्ये लसीकरण केंद्र सुरू असले तरी कोविशिल्ड आणि कोबरेव्हॅक्स या लशी उपलब्ध नाहीत. त्यामुळे फक्त कोव्हॅक्सीन घेतलेल्या नागरिकांनाच वर्धक मात्रा दिली जात असल्याचे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले. दरम्यान, करोना नियंत्रणासाठी चाचणी, पडताळणी, उपचार, लसीकरण आणि करोना अनुरूप वर्तन या पंचसूत्रीचा वापर केला जावा अशी सूचना सोमवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना यांनी केली. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, सीटी व्हॅल्यू तीसपेक्षा कमी असणारा नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवला जावा, वर्धक मात्रेचे प्रमाण वाढवावे, सारी आणि आयएलआय सव्र्हेक्षण जास्तीत जास्त प्रभावीपणे करावे, अशा सूचना सोना यांनी दिल्या. राज्यात साथरोग कायदा लागू असल्यामुळे खासगी दवाखान्यांतील तपासणीचे दर हे पूर्वीचेच दर आहेत, असे स्पष्टीकरण आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिले.
मुंबई महापालिकेकडूनही आढावा
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनीही एक आढावा बैठक घेतली. बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून ते लवकर बरे होणारे आहेत. मात्र वृद्ध, सहव्याधी, गर्भवती महिला यांच्यात करोनाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी योग्य उपचाराबरोबरच चाचण्यांवर भर देण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. मुंबईतील सरकारी रुग्णालये, महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सेव्हन हिल आणि कस्तुरबा रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध आहेत. परंतु संख्येत वाढ झाल्यास उपनगरीय रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महापालिका उपनगरीय रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.
लसीकरणाची स्थिती
मुंबईत आतापर्यंत १ कोटी ८ लाख ९३ हजार ४३५ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. ९८ लाख १४ हजार ७९३ नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तर केवळ १४ लाख ८७ हजार ७६४ नागरिकांनीच वर्धक मात्रा घेतली आहे.
‘कोव्हिशिल्ड’साठी पदरमोड
मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालय, के.जी. मित्तल रुग्णालय, मिना रुग्णालय, लाईफलाईन मेडिकल रुग्णालय, डॉ. अल्वास डायग्नोस्टिक सेंटर, हॉली फॅमिली रुग्णालय या खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हिशिल्ड लस उपलब्ध आहे. मात्र येथे वर्धक मात्रा घेण्यासाठी नागरिकांना ३८६ रुपये मोजावे लागतील.
मिश्र लसीकरणाबाबत अनभिज्ञता
सुरुवातीला कोबरेव्हॅक्स ही लस कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सीनच्या दोन मात्रा घेतलेल्यांना वर्धक मात्रा म्हणून देण्यास आयसीएमआरने परवानगी दिली. मात्र याबाबत डॉक्टरांमध्येच अनभिज्ञता असल्याचे दिसून आले. रुग्णालयांनीही या लशीचा साठा मागविलेला नाही. त्यामुळे मिश्र लसीकरणासाठी ही लस वापरण्यास परवानगी दिल्याची माहिती फार कमी जणांना आहे, असे एका डॉक्टरांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
कोव्हिशिल्ड साठा पाठविण्याबाबत आम्ही राज्य सरकारकडे मागणी केली आहे. मात्र त्यांच्याकडून आम्हाला अद्याप काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. सरकारकडून कोव्हिशिल्ड लशीचा साठा पाठविल्यास त्या नागरिकांना उपलब्ध करून देऊ. मात्र सध्यातरी आमच्याकडे साठा शिल्लक नाही. – डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका