महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे इ-तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना आता आपल्या सोबत छायाचित्रांकीत ओळखपत्र आणि आयपॅड, लॅपटॉप किंवा इंटरनेट असलेला मोबाइल सोबत बाळगावा लागणार आहे. अन्यथा इ-तिकिटाची प्रत वैध ठरणार नाही, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
विमान आणि रेल्वेप्रमाणेच आता एसटी महामंडळानेही इंटरनेटचा आधार घेत आपल्या सेवा अधिक सक्षम करण्याचा चंग बांधला आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. कागदमुक्त प्रशासनाचा प्रयत्न म्हणून प्रवाशाने इ-तिकिटाची प्रत आणण्याऐवजी थेट लॅपटॉप, आयपॅड किंवा मोबाइलवरून काढलेले इ-तिकीट त्यावरच बसवाहकाला दाखविण्याची योजना आखण्यात आली आहे. वाहक त्याच्याकडील नोंदींवरून संबंधित तिकीट पडताळून पाहील. लॅपटॉपवरून काढलेले तिकीट तपासल्यावर तो प्रवासी वाहकाला केवळ छायाचित्रांकीत ओळखपत्र दाखवेल. ते दाखविल्यानंतरच त्या प्रवाशाला बसमध्ये जागा मिळेल.
याबाबत महामंडळाचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सांगितले की, एसटी महामंडळाने अनेक मार्गावर वातानुकूलित बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला असून आगामी वर्षांमध्ये एसटीचा प्रवास अधिक सुखदायक आणि आधुनिक होणार आहे. पूर्वी प्रवाशांना इ-तिकिटाची प्रत सोबत ठेवावी लागत होती. आता नियमात बदल करण्यात आला असून इलेक्ट्रॉनिक गॅझेटसवरील तिकिटाची प्रतच वैध ठरविण्यात येणार आहे. वाहकांकडेही सहज हाताळता येतील असे इलेक्ट्रॉनिक तिकीट देण्याचे उपकरण असेल, ज्यावर ते प्रवाशांकडील इ-तिकीट तपासून पाहतील. त्यांच्या प्रवासाचे ठिकाण आणि मार्ग दोन्ही तपासतील. या तपासणीनंतरच प्रवाशांना बसमध्ये जागा देण्यात येईल. एसटी महांडळाचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले की, बस सुटण्यापूर्वी दोन दिवस आधी इ-तिकीट रद्द करण्याची मुदत पूर्वी होती. आता ही वेळ कमी करण्यात आली असून बस सुटण्यापूर्वी अथवा संबंधित बसचा आरक्षण तक्ता जाहीर होण्यापूर्वी चार तास आधी इ-तिकीट रद्द करता येईल. असे तिकीट रद्द केले तर त्याचे आरक्षण क्षुल्क आणि सुविधा आकार कापून उर्वरित पैसे प्रवाशाच्या खात्यामध्येच थेट जमा होतील. २०१० मध्ये बस सुटण्यापूर्वी ४८ तास आधी इ-तिकीट रद्द करण्याची मुदत होती. त्यामुळे प्रवासी इ-तिकीटाचा पर्याय वापरण्यास उत्सुक नव्हते. आता मुदत कमी करण्यात आली आहे.
केवळ मोबाइल, आयपॅड आणि लॅपटॉपवरील इ-तिकीटच एसटीत वैध
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे इ-तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना आता आपल्या सोबत छायाचित्रांकीत ओळखपत्र आणि आयपॅड, लॅपटॉप किंवा इंटरनेट असलेला मोबाइल सोबत बाळगावा लागणार आहे. अन्यथा इ-तिकिटाची प्रत वैध ठरणार नाही, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
First published on: 31-12-2012 at 02:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only mobile laptop ipod e ticket valid in st