५०३ बसमार्गापैकी अवघ्या एका मार्गावरील सेवेतून घसघशीत कमाई; मेट्रोच्या चलतीनंतरही ‘घाटकोपर ते अंधेरी’ बससेवेला प्रवाशांची गर्दी
घटती प्रवासी संख्या आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ राखता न आल्याने दोन आठवडय़ांपूर्वी ‘तोटय़ात’ चालणारे ५२ मार्ग बंद करण्याची घोषणा करणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमाच्या ५०३ मार्गापैकी अवघा एकच मार्ग नफ्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. घाटकोपर ते अंधेरी मार्गावर धावणाऱ्या ३४० बस सेवेने रोज साडेसहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असून यातून दरमहा सुमारे ८० ते ८२ लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याच मार्गावर मेट्रो सेवा सुरू होऊन जवळपास दोन वर्षे होत आली तरी ‘३४०’वरील प्रवाशांची गर्दी कायम आहे.
सध्या मुंबई व उपनगरात बेस्टच्या ५०३ मार्गावर सुमारे ४१००हून अधिक बस गाडय़ा चालवल्या जातात. यात ३४६ बस गाडय़ा सर्वसाधारण मार्गावर, १२४ मर्यादित, १२ जलद, २२ वातानुकूलित मार्गावर धावतात. यातील पूर्णपणे तोटय़ात धावणाऱ्या मार्गाचा सर्वाधिक म्हणजे तब्बल ३७३ मार्गाचा समावेश आहे, तर ‘ना नफा-ना तोटा’च्या यादीत सुमारे १३९ मार्गाचा समावेश आहे. बेस्टकडून पूर्णपणे तोटय़ात धावणाऱ्या मार्गाचा ‘सी’ श्रेणीत, तर ‘ना नफा-ना तोटा’त धावणाऱ्या मार्गाचा ‘बी’ श्रेणीत समावेश करण्यात येतो, तर सर्वोत्तम आणि शंभर टक्के उत्पन्न देणाऱ्या मार्गाचा ‘ए-प्लस’ मार्गात समावेश केला जातो. या यादीत अर्थात ‘ए-प्लस’मध्ये घाटकोपर-अंधेरी मार्गावर धावणाऱ्या ३४० बस मार्गाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवाशांच्या सर्वाधिक वर्दळीचा मार्ग ठरत आहे. या मार्गावर ६२ बस गाडय़ा चालवल्या जात असून दिवसभरात २२० फेऱ्या चालवल्या जातात. सकाळी साडेचार ते रात्री सवा एक वाजेपर्यंत या मार्गावर ही बससेवा चालवली जाते. यातून रोज ६ लाख ९३ हजार प्रवासी प्रवास करत असून गेल्या फेब्रुवारीत बेस्टला या मार्गावरील बससेवेतून ८२ लाख ९८ हजार ३५६ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे समजते.
‘मेट्रो’पेक्षा ३४० ‘बेस्ट’
सध्या मेट्रोने रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे ३ लाख असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र घाटकोपर-अंधेरी मार्गावर धावणाऱ्या ३४० बस गाडय़ांनी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे ६ लाखांहून अधिक असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले. यात प्रवासी भाडय़ात बेस्टचा प्रवास स्वस्त असल्याने प्रवासी बेस्टला पसंती देत असल्याचे सांगण्यात आले.
बेस्ट गाडय़ांच्या मार्गांवर धावणाऱ्या बेकायदेशीर अॅप आधारित आणि खासगी बस गाडय़ांमुळे बेस्ट सेवेला फटका बसत आहे. अशा काही मार्गावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने अवैध बस गाडय़ांवर कारवाई केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी या मार्गावर कारवाई करण्यात आली होती. याचे फलित पाहायला मिळत आहे.
– डॉ. जगदीश पाटील, महाव्यवस्थापक, बेस्ट
विवेक सुर्वे,