प्रसाद रावकर, लोकसत्ता
मुंबई: गणेशोत्सवासाठी शाडूच्या मातीपासून घरगुती गणेशमूर्ती घडविणे बंधनकारक करताना मुंबई महानगरपालिकेने मूर्तिकारांनी प्रोत्साहन देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर शाडूची माती विनामूल्य उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रथम मागणी करणाऱ्यास प्राधान्य तत्वावर मूर्तिकारांना शाडूची माती उपलब्ध करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने शाडूच्या मातीचा पुरवठा करणाऱ्यांचा शोध सुरू केला असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून शाडूची माती खरेदी करण्यात येणार आहे. दरम्यान, निविदा प्रक्रियेअंती खरेदी केलेली शाडूची माती मूर्तिकारांना मिळेपर्यंत पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या प्लास्टर ऑफ पॅरिसवरील (पीओपी) बंदी आदेशांचे पालन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या गणेशोत्सवापासून घरगुती गणेशमूर्ती शाडूची माती अथवा पर्यावरणपूरक घटकांपासून तयार करणे बंधनकारक केले आहे. मुंबईमध्ये सुमारे दोन लाख २५ हजार घरगुती गणेशमूर्तींची आवश्यकता आहे. गेल्या वर्षीपर्यंत बहुसंख्य भाविक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीची घरी प्रतिष्ठापना करीत होते. मात्र केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पीओपी बंदीच्या आदेशांमुळे मुंबईत शाडूची माती अथवा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती शाडूची माती वा पर्यावरणपूरक घटकांपासून घडवावी लागणार आहे. मागणीनुसार दोन लाख २५ हजार घरगुती गणेशमूर्ती साकरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शाडूच्या मातीची गरज भासणार आहे.
आणखी वाचा-आदर्श घोटाळ्याशी संबंधित लाच प्रकरण: कैलाश गिडवानी, जवाहर जगियासी दोषमुक्त
पीओपीऐवजी पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर प्रत्येक विभागातील मूर्तिकारांना शाडूची माती विनामूल्य उपलब्ध करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागात सुमारे दोन ट्रक म्हणजेच २० टन शाडूच्या मातीचा पुरवठा करण्यात येणार आहे. ही माती मूर्तिकारांना प्रायोगिक तत्वावर विनामूल्य उपलब्ध करण्यात येणार आहे. मात्र प्रथम मागणी करणाऱ्यास प्राधान्य तत्वावर या मातीचा मूर्तिकारांना पुरवठा करण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
शाडूच्या मातीचा राजस्थान, गुजरात आदी राज्यांतून पुरवठा होतो. त्यामुळे महानगरपालिकेने पुरवठादारांचा शोध सुरू केला आहे. शाडूची माती कोणत्या दरात उपलब्ध होईल याचीही चाचपणी महानगरपालिकेने सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांसाठी प्रत्येकी २० टन यानुसार सुमारे ४८० टन शाडूची माती उपलब्ध करावी लागणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर शाडूची माती कमी दरात उपलब्ध करणाऱ्याकडून ती खरेदी करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. शाडूच्या मातीबाबत तपशीलवार माहिती मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून माती खरेदी करण्यात येणार आहे. त्यानंतर मूर्तिकांना मागणीनुसार उपलब्ध करण्यात येणार आहे. तोपर्यंत पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे.