मुंबईच्या सायबर गुन्ह्यंचा तपास करायला दोनच निरीक्षक
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तंत्रज्ञानाचा किंवा तंत्रसाधनांचा वापर करून केल्या जाणाऱ्या सायबर गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली असताना अशा गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी अवघे दोनच पोलीस निरीक्षक उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यातच, स्थानिक पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सूचना दिल्या असतानाही तक्रारदारांना सायबर पोलीस ठाण्यात पाठविण्यात येत असल्याने या अधिकाऱ्यांवरील भार वाढत चालला आहे. विशेष म्हणजे, साहाय्यक पोलीस निरीक्षकांना तपास अधिकाऱ्याचा दर्जा द्यावा, असा मुंबई पोलिसांनी पाठवलेला प्रस्ताव सरकारदरबारी धूळ खात पडला आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीप्रमाणे मुंबई सायबर गुन्ह्यांची राजधानी बनली आहे. मार्च महिन्यापर्यंत माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत आतापर्यंत ८० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचे तपास अधिकारी म्हणून एका निरीक्षकाला ४० गुन्ह्यांवर लक्ष ठेवावे लागत आहे. सन २०१५ साली गुन्ह्यांची संख्या २८६ होती, तर याआधी दाखल झालेल्या गुन्ह्य़ांचा आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याचीही जबाबदारी या निरीक्षकांवर आहे. सायबर गुन्ह्यांचे तपास अधिकारी म्हणून काम करण्याचा अधिकार फक्त पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यालाच आहे. त्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुल येथे असलेल्या सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत दोन पोलीस निरीक्षकांवर कामाचा प्रचंड ताण असून त्याचा परिणाम साहजिकच तपासाच्या विलंबात होताना दिसत आहे.
प्रस्तावावर तोडगा नाही
स्थानिक पोलीस ठाण्यांनी सायबर कक्ष विकसित करून तपास करण्याच्या सूचना असूनही तक्रारदारांना थेट सायबर पोलीस ठाण्याकडे जाण्यास सांगितल्याने पोलीस ठाण्यावरचा भार वाढतच आहे. ठाण्यातील उपनिरीक्षक-साहाय्यक पोलीस निरीक्षक दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करत असले तरी गुन्ह्यांशी संबंधित प्रत्येक कागदपत्रावर तपास अधिकारी म्हणून निरीक्षकाचीच सही लागत असल्याने निरीक्षकांना अनेकदा पोलीस ठाण्यातच बसून राहण्याची वेळ येत आहे. यावर तोडगा म्हणून पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षकांनाही तपास अधिकारी म्हणून काम करण्याचा अधिकार देण्यात यावा, असा प्रस्ताव मुंबई पोलिसांकडून पाठविण्यात आला होता. मात्र, त्यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.

‘विशेष भत्ता द्या’
सायबर गुनह्यांचा तपास करणे हे अतिशय वेळखाऊ, संयमाचे काम आहे. तसेच या गुनह्यांना कुठलीही हद्द नसल्याने गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांना २४ तास तयार राहावे लागते. सायबरविश्वात दिवसागणिक होणाऱ्या बदलांशी जुळवून घेत गुन्हेगारांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्याचे आव्हानही पोलिसांपुढे असते. यामुळे, बहुतेक पोलीस या पोलीस ठाण्यात काम करण्यास अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच सायबर पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना मूळ वेतनावर ५० टक्के विशेष भत्ता द्यावा, असाही प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

Story img Loader