राज्य सरकारने मुंबई आणि परिसरातून लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी नवे परिपत्रक काढले आहे. यानुसार आता अत्यावश्यक सेवेतील लोकांना लोकल प्रवासासाठी लसीकरणाचा नियम लागू होणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. एवढंच नाही तर लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी फक्त एक महिन्याचा पास दिला जात होता. आता ३ महिने, ६ महिने किंवा वर्षभरासाठीही लोकलचा पास दिला जाणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
याआधी शासनाची गरज म्हणून अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच मुंबई आणि परिसरातून लोकल ट्रेनने प्रवासाला परवानगी देण्यात आली होती. तर ऑगस्ट महिन्यापासून लोकल प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य लोकांना लसीकरणाचा नियम लागू केला होता. ज्यांचे लशीचे दोन डोस झाले आहेत आणि त्यानंतर १४ दिवसांचा कालावधी झाला आहे त्याच नागरीकांना युनिवर्सल पास दिला जात होता. त्याआधारे लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी लोकलचा पास दिला जात होता. मात्र आता लसीकरण हे मोठ्या प्रमाणात झालं असून लसीकरणाचा वेगही चांगला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही सर्वसामान्य लोकांप्रमाणे लसीकरणाचा नियम लागू करत असल्याचं राज्य सरकारने जाहिर केलं आहे. तेव्हा अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही लसीकरणाचे दोन डोस झाले असतील तरच युनिवर्सल पास उपलब्ध होणार आहे, लोकलचा पास काढता येणार आहे.
लसीकरणाचा वेग वाढला असल्याने आता लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. म्हणूनच २८ तारखेपासून मुंबई आणि परिसरात मध्य आणि पश्चिम रेल्वेने पुर्ण क्षमतेने लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभुमिवर आता ३ महिने, ६ महिने किंवा वर्षभराचा पास काढण्याची सुविधा सुरु करण्यास रेल्वेला परवानगी देत असल्याचं परिपत्रकाद्वारे जाहिर करण्यात आलं आहे.
एका महिन्यापेक्षा जास्त दिवसांचा पास जरी काढता येणारा असला तरी तिकीट मिळण्याची सुविधा अजुनही सुरु करण्यात आलेली नाही. तेव्हा पासचा भुर्दंड सहन करण्यापेक्षा तिकीटाची सुविधा कधी सुरु केली जाते याकडे आता सर्वसामान्य लोकल प्रवाशांचे लक्ष लागून राहिलेलं आहे.