परळीतील वीजप्रकल्प बंद पडला असून दाभोळमधील वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. या पाश्र्वभूमीवर यंदा उन्हाळय़ात राज्यात वीजटंचाई जाणवू नये यासाठी एप्रिल अखेपर्यंतसाठी बाजारपेठेतून अल्पकालीन वीजखरेदी करण्यात आली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत जादा पाणी उपलब्ध असलेला कोयना जलविद्युत प्रकल्प व विजेच्या बाजारपेठेत रास्त दरात उपलब्ध असलेल्या विजेचा प्रामुख्याने यंदा राज्याला आधार असणार आहे.
राज्यात वीजमागणी व पुरवठय़ात सध्या सरासरी तूट ५०० मेगावॉटची आहे. पण पाणीटंचाईमुळे परळीचा ११३० मेगावॉटचा संच बंद पडला आहे. तर वायूटंचाईमुळे दाभोळ वीज प्रकल्पातील वीजनिर्मितीही जवळपास ठप्प आहे. त्यातून सुमारे दीड हजार मेगावॉटची तूट निर्माण झाली आहे. मार्चपासून उन्हाच्या झळांबरोबरच वीजमागणीही वाढेल. पण यंदा दुष्काळामुळे शेतीसाठी कृषीपंपांचा वापर कमी होणार आहे. फार तर मार्चपर्यंतच काही ठिकाणी शेतीपंप चालतील, असे चित्र आहे. त्यामुळे वीजमागणीत सुमारे ७५० मेगावॉटचा दिलासा मिळणार आहे.
या पाश्र्वभूमीवर उन्हाळय़ातील विजेची तरतूद करण्यासाठी एप्रिलपर्यंत ६०० मेगावॉटची अल्पकालीन वीजखरेदी करण्यात आली आहे. शिवाय विजेच्या बाजारपेठेतून ३०० ते ४०० मेगावॉट वीज गरजेनुसार घेतली जात आहे. त्याचबरोबर परळी प्रकल्पाचा कोळसा आता भुसावळ प्रकल्पात वळवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोळशाअभावी बंद असलेला तेथील ५०० मेगावॉटचा संच सुरू होईल.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोयना जलविद्युत प्रकल्पात वीजनिर्मितीसाठी सहा टीएमसी जादा पाणी शिल्लक आहे. एकूण सुमारे २२ टीएमसी पाणी जलविद्युत प्रकल्पासाठी मिळणार आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी कमाल वीजमागणीच्या वेळी कोयना वीजप्रकल्प पूर्णक्षमतेने चालवून त्यातून सुमारे १९२० मेगावॉट वीज मिळेल. अगदीच गरज लागली तर विजेच्या बाजारपेठेत सरासरी तीन रुपये प्रति युनिट दराने वीज उपलब्ध आहे, असा विश्वास ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा