हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपल्याकडची भेळ हे मिश्र म्हणजेच फ्यूजन खाद्य संस्कृतीची ठळक खूण आहे. आंबट-गोड, तिखट-तुरट पदार्थाची सरमिसळ नीटपणे जमून आली की त्यातून भन्नाट चव जन्माला येते. विशेषत: पावसाळ्यात अशा पदार्थाची खुमारी अधिकच वाढते. डोंबिवली पूर्व विभागातील ‘ओपन टेबल’मध्ये फ्यूजन पद्धतीच्या नावीन्यपूर्ण शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थाची चव चाखता येते.
खाणे म्हणजे केवळ पोट भरणे नव्हे. ते एक यज्ञकर्म असते. जसे गाण्याच्या मैफलीचे काही संकेत असतात-उदा. सुरुवात साधारणत: श्रीगणेश वंदना आणि शेवट भैरवीने..अगदी तसेच खाद्य मैफलीचेही असते. थेट मेन कोर्सला तोंड देण्याआधी आधी स्टार्टर्स मागविले जातात. निरनिराळे सुप्स, मसाला पापड हे नेहमीचे स्टार्टर झाले. ‘ओपन टेबल’मध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे स्टार्टर्स उपलब्ध आहेत. यामध्ये चिकन फिंगर्स तसेच व्हेज क्रिस्पी, चिली सॉस तसेच चिकन ६५ सारखेच व्हेज ६५ मिळते. त्यामुळे अशा गरम पदार्थाचा आस्वाद घेतल्यानंतर ‘वा, लाजबाव !’ अशी उत्स्फूर्त दाद खवय्ये देतात. ओपन टेबलचे मालक आदित्य रॉय यांना दुचाकीवर फिरण्याची अतिशय आवड आहे. त्यामुळे त्याने या पदार्थाना ‘कीक स्टार्स’ असे नावही दिले आहे. त्यामुळे भूक लागल्यानंतर हे पदार्थ चवीला तर ‘लय भारी’ आहेतच, मात्र त्याचबरोबर ते शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचे काम करतात, असे आदित्य सांगतात. ‘चिकन फिंगर्स’मध्ये आलं लसूण पेस्ट टाकून चिकनच्या तुकडय़ाला हलकसे तळले जात असल्याची माहिती आदित्य यांनी दिली. आदित्य यांनी रिझवी महाविद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंट केले आहे. त्यामुळे या व्यवसायातले शास्त्रशुद्ध ज्ञान त्यांच्याकडे आहेच, पण त्याचजोडीला ते स्वत:ही खाद्यरसिक असल्याने वेगवेगळे पदार्थ तयार करीत असतात. त्यांच्या त्या रसिकतेचा प्रत्यय ‘ओपन टेबल’मधील प्रत्येक पदार्थ खाताना येतो. खवय्यांना पौष्टिक द्यावे म्हणून त्यांनी लेमन कोरिएंडर सुप तयार केले आहे. या सर्व सुप पदार्थाना त्याने ‘चायनीज फ्युएल’ असे संबोधले आहे. सॅन्डविचेसमध्ये कोलस्लो व्हेज सँडविच, कॉर्न मायो चीज ग्रील सॅन्डविज, कोलस्लो चिकन सॅन्डविच, चिकन टिक्का सॅन्डविच आदी विविध प्रकारचे सॅन्डविच येथे खाद्य रसिकांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आहेत. फ्रुट पंच, कॉस्मोपोलिटिअन पॅन गॅलॅक्टिक, मम्स डिलाईट अशा प्रकारचे विविध मॉकटेल्स ‘ओपन टेबल’ चे आणखी एक वैशिष्टय़ आहे. कॉस्मोपोलिटिअन मॉकटेल थोडे तिखट असल्याने मुलींपेक्षा मुलांना हे मॉकटेल अधिक आवडत असून मुलींना ‘मम्स डिलाईट’ किंवा ‘मिक्स फ्रुट पंच’ हे मॉकटेल अधिक प्रमाणात आवडते. हे मॉकटेल एक ग्लास पिऊन समाधान होत नाही. त्यामुळे खवय्ये वन मोअरची ऑर्डर देतात. ‘मम्स डिलाईट’ या मॉकटेल मध्ये पेरू या फळाचा वापर केला जातो. हे सगळे मॉकटेल्स आदित्य घरी बनवितात. त्यांची चव कधीही उत्तमच असली पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष असतो.
तरुणांची, विशेषत: बॅचलर्स लोकांची आवडती डिश म्हणजे आम्लेट. अनेकदा शाकाहारी आणि मांसाहारी खवय्यांचा पंक्तिभेद आम्लेट खाताना मिटतो. कारण अनेक शाकाहारी माणसे अपवाद म्हणून आम्लेट खातात. तसा हा पोटभरू पदार्थ आहे. अगदी पाच मिनिटात तयार करता येतो. त्यामुळे भूक लागली की तव्यावर चटकन आम्लेट टाकले जाते. तरुण पिढीचे हे आम्लेटप्रेम ठाऊक असल्याने आदित्य रॉय यांनी दहा विविध प्रकारचे आम्लेट ‘ओपन टेबल’मध्ये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात साधे आम्लेट, हाफ फ्राय, फुल फ्राय याचबरोबर मसाला स्टफ आम्लेट, चीज मसाला स्टफ आम्लेट, मसाला ब्रेड स्टफ आम्लेट आदी प्रकार खवय्यांना खावयास मिळतात. मसाला स्टफ आम्लेट हा आदित्य यांनी स्वत: तयार केलेला पदार्थ असून या पदार्थाला खवय्यांची अतिशय मागणी आहे. शेजारीच मॉडेल महाविद्यालय असल्याने या छोटय़ाशा दुकानात खूप गर्दी होते. चिली सॉस हे तर या तरुणाईचे आवडते खाद्य आहे. सर्वच पदार्थ चविष्ट असल्याने या दुकानात गेल्यानंतर ‘हे खावे की ते खावे’ अशी खवय्यांची स्थिती होत असते. या छोटय़ाशा दुकानाची सजावटही त्याने बाईक्सच्या काही पार्ट्सपासून केली आहे. दुकान सजविण्यात त्याचे मित्र अद्वैत परब आणि महेश शिरसंगी यांने मदत केल्याचे त्यांनी सांगितले. आलेल्या सर्व खवय्यांचा विचार केला जातो. तिखट अशी ख्याती असलेला पदार्थ खवय्यांनी विनंती केली तर कमी प्रमाणात मिरची पूड टाकून केला जातो. आजी-आजोबांपासून सर्वाना आवडेल असे शाकाहारी बर्गरही त्याने स्वत: तयार केले आहेत. त्यामुळे खवय्यांना आपल्या सवयीच्या चवीनुसार हा पदार्थ खाण्यास उपलब्ध होतो. ४० ते २०० रुपयांपर्यंत ‘ओपन टेबल’मध्ये पदार्थ खायला मिळतात.
- कुठे-ओपन टेबल, श्रीराम शॉपिंग सेंटर , मॉडेल महाविद्यालयाजवळ, एमआयडीसी, डोंबिवली (पू.)
- कधी- सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत