‘ऑपरेशन स्माइल’च्या माध्यमातून हजारो मुलांची नववर्षांत ‘घरवापसी’
वाट चुकलेल्या वा पळविल्या गेलेल्या हजारो मुलांची घरवापसी करण्यासाठी ‘ऑपरेशन स्माइल’ योजनेचा दुसरा टप्पा राज्यात सुरु करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार गेल्या वर्षीपासून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेला चांगले यश मिळत असून पोलिसांनी विशेष लक्ष घालून लहान मुलांचा छडा लावावा व त्यांना त्यांच्या घरी पोचवावे, अशा सूचना राज्यभरातील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. ही विशेष मोहीम १ ते ३१ जानेवारीपर्यंत राबवली जाईल.
एका पाहणीनुसार, दरवर्षी मुंबईसह राज्यात साधारणपणे दहा हजाराहून अधिक मुले वाट चुकून येत असतात. गरिबी, सावत्र आईवडिलांकडून वा अन्य नातेवाईकांकडून होणारा छळ, यामुळे खेडय़ापाडय़ातून आणि विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड यासारख्या राज्यांमधून मुंबईत आणि अन्य मोठय़ा शहरांमध्ये मुले येतात. भीक मागणे, बालमजुरी व अन्य कारणांसाठी मुलांना पळवूनही आणले जाते. तर काही मुले वाट चुकल्याने भरकटत आलेली असतात. त्यामुळे रेल्वे, एसटीस्थानके, फूटपाथ आणि प्रार्थनास्थळांच्या परिसरात मुले आसरा घेतात. अशा एकटय़ादुकटय़ा मुलांचा शोध घेऊन त्यांची चौकशी केल्यावर त्यांचा पत्ता आणि घर सोडल्याची कारणे समजून येतात. त्यानंतर त्यांचा कुटुंबियांचा शोध घेऊन त्यांच्याकडे मुलांना सोपविण्यासाठी ‘ऑपरेशन स्माइल’ ची संकल्पना राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार प्रत्येक राज्याकडून ती राबविली जाते.यासंदर्भात गृहविभागाचे प्रधान सचिव रजनीश सेठ यांच्याकडे वरिष्ठ अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच पार पडली. यात अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाली. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सहा हजाराहून अधिक मुलांची ‘घरवापसी’ करण्यासाठी पावले टाकली जातील.
हेल्पलाइन १०९८
गेल्या वर्षीच्या पहिल्या टप्प्यात ४२०० मुलांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द केल्याची माहिती ‘प्रथम’चे संचालक किशोर भामरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या योजनेत स्वयंसेवी संस्थांबरोबरच जागरूक नागरिकांनीही एकटय़ादुकटय़ा फिरत असलेल्या मुलांची माहिती १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर वा पोलीस नियंत्रण कक्षास दिल्यास ते उपयुक्त ठरणार आहे.

Story img Loader