लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: सेंट जॉर्ज रुग्णालय करोना विशेष रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे सेंट जाॅर्ज रुग्णालयातील विविध विभाग बंद करण्यात आले होते. करोना नियंत्रणात आल्यानंतर हळूहळू रुग्णालयातील विविध विभाग सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार रुग्णालयातील नेत्र विभाग येत्या गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. हा विभाग बंद असल्याने रुग्णांना जे.जे. रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत होते. आता त्यांना दिलासा मिळेल.
सेंट जॉर्जेस रुग्णालयात अद्ययावत शस्त्रक्रियागृह व रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू केल्यानंतर आता विविध विभाग टप्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यापासून सेंट जॉर्ज रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभाग सुरू करण्यात येणार आहे. या विभागाची जबाबदारी डॉ. छाया चहांदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
हेही वाचा… सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प: तुंगारेश्वर बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण
डॉ. छाया चहांदे या सध्या अलिबाग जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना तीन दिवस सेंट जॉर्जेस रुग्णालय व तीन दिवस अलिबाग येथील रुग्णालयात सेवा द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत नेत्रचिकित्सा विभागामध्ये चार निवासी डॉक्टरही असणार आहेत. तसेच नेत्रचिकित्सा विभागाचा बाह्यरुग्ण विभाग गुरुवारी आणि शनिवारी असणार आहे, तर शुक्रवारी रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यामुळे रुग्णांना चांगले उपचार मिळण्यास मदत होईल, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.