मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काही दिवसांतच, नवीन आर्थिक वर्षांसाठी गुंतवणूकदारांना सजग आणि सज्ज करणारा विशेषांक ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या प्रकाशनानिमित्त बुधवारी सायंकाळी दादरमध्ये, सांपत्तिक आरोग्याची काळजी म्हणून आवश्यक असलेल्या ‘वेल्थ चेकअप’ची संधी सर्वांसाठी खुली झाली आहे.
मिळकत आणि खर्चाचा मेळ घालून, वर्तमान तसेच चांगल्या भविष्यासाठी आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी काय करता येईल, याचा नेमका अंदाज येण्यासाठी प्रत्येकालाच ‘वेल्थ चेकअप’ गरजेचेच आहे. हा सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य उपक्रमाचे आयोजन बुधवार, ५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता दादरमध्ये तर शुक्रवार, ७ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता ठाण्यामध्ये करण्यात आले आहे. या निमित्ताने सर्वांसाठी ‘गुंतवणूक-संकल्प’ ठरत आलेल्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिक विशेषांकाच्या १२ व्या अंकाचे प्रकाशनही होत असून, हा अंकदेखील उपस्थितांना मिळविता येईल. यावेळी गुंतवणुकीतून जे कमावले त्या संपत्तीचे विनासायास, विना-तंटा स्वकीयांना हस्तांतरण व्हावे यासाठी करावे लागणारे ‘इच्छापत्र’ (विल) आणि त्या अंगाने सर्व प्रश्न-शंकांचा उलगडा सनदी लेखापाल आणि कर-सल्लागार दीपक टिकेकर करतील.