लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : म्हाडा उपाध्यक्षांच्या निर्देशानुसार म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाने लाभार्थी, नागरिकांच्या तक्रारी – समस्यांचे निवारण करण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिला जनता दरबार २८ मार्चला आयोजित करण्यात आला आहे. या जनता दरबारात सहभागी होऊन लाभार्थी, नागरिकांना आपल्या तक्रारींचे, समस्यांचे निवारण करण्याची संधी मिळणार आहे.
म्हाडा लाभार्थी, उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांसह सर्वसामान्यांच्या म्हाडाशी संबंधित अनेक तक्रारी, समस्या असतात. या समस्यांचे, तक्रारींचे वेळेत आणि योग्य निराकरण होत नसल्याने संबंधितांना म्हाडाच्या फेऱ्या माराव्या लागतात. ही बाब लक्षात घेता म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी वांद्रे येथील म्हाडा भवनात लोकशाही दिन आयोजित करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला. त्यानुसार दर महिन्याला लोकशाही दिन आयोजित केला जात असून अनेकांच्या समस्यांचे निराकरण याद्वारे केले जात आहे.
या लोकशाही दिनाचे महत्त्व आणि त्याचे सकारात्मक परिणाम लक्षात घेता काही दिवसांपूर्वी जयस्वाल यांनी म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळात लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर जनता दरबार घेण्याचे निर्देश दिले होते. महिन्यातून दोन वेळा जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानुसार आता विभागीय मंडळ कामाला लागले आहे.
कृती आराखड्यात जनता दरबारचा समावेश
नाशिक मंडळाने १९ मार्चला पहिला जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. तर आता छत्रपती संभाजीनगर मंडळातील लाभार्थी, नागरिकांनाही म्हाडाशी संबंधित आपल्या तक्रारी-समस्यांचे निराकरण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, म्हाडाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यातही जनता दरबार आयोजित करून नागरिक, म्हाडा लाभार्थींच्या तक्रारींचे योग्य निराकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे म्हाडा उपाध्यक्षांच्या निर्देशाचे सर्व विभागीय मंडळाकडून पालन केले जाणार आहे.
अधिकाऱ्यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या कार्यालयात २८ मार्चला पहिला जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे. या विभागीय मंडळात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे मराठवाड्यातील म्हाडा लाभार्थ्यांना आता आपल्या समस्या, तक्रारी मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी त्यांना मंडळाकडे लेखी निवेदन द्यावे लागणार आहे. त्यामुळे नागरिक, लाभार्थींनी आपल्या समस्या, तक्रारींबाबत अर्ज करून जनता दरबारात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.