लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : अकरावी प्रवेशाची ‘पहिली विशेष प्रवेश यादी’ सोमवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेणे टाळणाऱ्या विद्यार्थ्यांनाही विशेष फेरीत सहभागी होता येणार आहे. सुरुवातीच्या तिन्ही नियमित फेऱ्यांमध्ये प्रतिबंधित झालेले सर्व विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच, विशेष फेरीपासून पुढे कोणत्याही विद्यार्थ्यास प्रतिबंधित केले जाणार नाही.
विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर जाऊन संबंधित महाविद्यालयातील रिक्त जागांची स्थिती तपासून महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
पहिल्या विशेष यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येतील. तसेच, २६ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून ३१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करून वैयक्तिक माहिती अर्जाचा भाग १ भरू शकतात आणि महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. याच कालावधीत संस्थात्मक, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन या कोटांतर्गत प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉगिनद्वारे अर्ज भरून ऑनलाईन पसंती नोंदविता येईल. त्यानंतर कोटांतर्गत विद्यार्थ्यांची प्रवेश यादी ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोटांतर्गत प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.
अकरावी प्रवेशासाठीच्या तिसऱ्या नियमित फेरीअखेर १ लाख ४२ हजार ७८७ (४९.४ टक्के) विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर १ लाख ४६ हजार २६९ विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. तर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील प्रवेश मिळून ६४.४८ टक्के जागा रिक्त आहेत.
तिसऱ्या नियमित फेरीनंतर प्रवेश प्रक्रियेची स्थिती
फेरी, कोटा | उपलब्ध जागा | प्रवेश घेतलेले विद्यार्थी | रिक्त जागा |
केंद्रीय प्रवेश | २ लाख ३० हजार ६३० | १ लाख १ हजार ५६ | १ लाख ७३ हजार ४४० |
संस्थात्मक प्रवेश | २६ हजार ३७४ | ८ हजार ४४५ | ११ हजार ६११ |
अल्पसंख्यांक कोटा | १ लाख ७ हजार ६७५ | २९ हजार ५४१ | ४१ हजार ६६१ |
व्यवस्थापन कोटा | १८ हजार ७१० | ३ हजार ७४५ | १३ हजार ८९० |
एकूण | ३ लाख ८३ हजार ३८९ | १ लाख ४२ हजार ७८७ | २ लाख ४० हजार ६०२ |