मुंबई : फ्रान्सच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक वारशाचे प्रतीक असलेल्या दुर्मिळ फ्रेंच चलनी नोटा पाहण्याची अनोखी संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ आणि ‘अलायन्स फ्राँन्सेस द बॉम्बे’ आणि ‘अव्हिड लर्निंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बियॉण्ड फेस व्हॅल्यू – फ्रेंच चलनी नोटांचे जागतिक डिझाइन्स’ या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २४ एप्रिलपर्यंत पाहता येणार आहे.

फ्रेंच चलनी नोटा या फ्रान्स संस्कृतीचा व प्राचीन कलेचा उत्तम नमुना मानल्या जातात. या नोटांवर फ्रान्सच्या प्रसिद्ध इतिहासकार, कलाकार, वैज्ञानिक आणि वास्तुशास्त्रातील अनेक वैशिष्ट्ये आढळतात. फ्रेंच नोटांची छपाई अत्यंत सूक्ष्म आणि कलात्मकतेने केली जाते. त्यामुळेच फ्रेंच चलनी नोटांना आर्थिक व्यवहारापलीकडे अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. या नोटा ऐतिहासिक दस्तावेज समजल्या जातात. फ्रान्समध्ये युरो चलन सुरू होण्यापूर्वी फ्रेंच फ्रँक हे अधिकृत चलन होते.

या नोटांंची निर्मिती, छपाई, त्यावरच्या कलात्मक रचना यामागील गूढ कथांमधून फ्रेंच नोटांचा इतिहास अतिशय रंजकपणे उलगडत जातो. या प्रदर्शनासाठी फ्रेंच चलनी नोटांचे संकलन प्रसिद्ध संशोधिका रुक्मिणी डहाणूकर यांनी केले आहे. ‘चलनी नोट ही जगातील सर्वाधिक देवाणघेवाण केली जाणारी कला आहे. गेली २० वर्षे मी या विषयाचा अभ्यास करते आहे.

युरोपमध्ये युरो लागू झाल्यानंतर फ्रान्सने स्वतःच्या नोटा छापणे थांबवले. त्यामुळे या प्रदर्शनातून फ्रान्सच्या चलनी नोटा पाहणे म्हणजे ऐतिहासिक नोटांचा संग्रह मांडण्यासारखे आहे’ अशा शब्दांत रुक्मिणी डहाणूकर यांनी या अनोख्या प्रदर्शनामागचा उद्देश स्पष्ट केला. हे प्रदर्शन दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोर्टमधील नॅशनल मॉडर्न आर्ट गॅलरी येथे पाहता येणार आहे.