मुंबई : देशभक्ती सिद्ध करण्यासाठी शेजारील देशाच्या कलाकारांशी शत्रुत्व, वैर बाळगण्याची आवश्यकता नाही. किंबहुना, पाकिस्तानी कलाकारांना विरोध ही देशभक्ती नव्हे, असे परखड मत उच्च न्यायालयाने गुरुवारी नोंदवले. तसेच पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली.
शुद्ध मनाची व्यक्ती दोन्ही देशांमध्ये शांतता, एकोपा वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे स्वागतच करेल. खरा देशभक्त हा नि:स्वार्थी असतो, तो सर्वस्वी आपल्या देशासाठी समर्पित असतो, तो देशोपयोगी उपक्रमांचे स्वागतच करेल, असेही न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने नमूद केले. भारतीय सिनेसृष्टीशी संबंधित संस्थांसह, निर्माता संघटनांना, पाकिस्तानी सिनेकलाकार, गायक, संगीतकार, गीतकार आणि तंत्रज्ञांबरोबर काम करण्यास कायमस्वरूपी मज्जाव करण्याचा आदेश केंद्र सरकारला देण्याच्या मागणीसाठी फय्याज अनवर अन्सारी यांनी याचिका केली होती.
‘मागणी सौहार्दभंग करणारी…’
याचिकाकर्त्याने केलेली मागणी ही सांस्कृतिक सौहार्द, एकता, शांतता भंग करणारी आहे. तसेच पुरोगामी विचारांच्या विरोधात असून त्याचे समर्थन करता येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. ही मागणी सौहार्दभंग करणारी असल्याचे न्यायालयाने नमूद केले.