पर्यावरणविषयक सुनावणीत सर्वपक्षीय गोंधळ
ट्रॉम्बे येथील वीजप्रकल्पातील संच क्रमांक ६ या सध्या तेल आणि वायूवर चालणाऱ्या ५०० मेगावॉट क्षमतेच्या वीजनिर्मिती संचाचे आधुनिकीकरण करून तो कोळशावर चालवण्याच्या ‘टाटा पॉवर कंपनी’च्या योजनेला मंगळवारी पर्यावरणविषयक जनसुनावणीत जोरदार विरोध झाला. गोंधळामुळे ही सुनावणी अध्र्यातच आटोपती घेण्याची वेळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर आली.
या वीजसंचाच्या आधुनिकीकरणाबाबत पर्यावरणविषयक जनसुनावणी मंगळवारी चेंबूर येथे झाली. त्यात काँग्रेसचे आमदार चंद्रकांत हंडोरे, शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण विभागाचे अ‍ॅड. अरूण जगताप, काँग्रेसच्या नगरसेवक सीमा माहुलकर, निलिमा डोळस आदींनी हा वीजसंच कोळशावर चालवण्यास जोरदार विरोध केला. कोळशावर वीजसंच चालवल्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होईल, राखेचे उत्सर्जन होईल. त्यामुळे स्थानिक लोकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतील, असे आक्षेप घेण्यात आले.
ट्रॉम्बे येथे टाटा पॉवर कंपनीचा १४३० मेगावॉट क्षमतेचा वीजप्रकल्प आहे. संच क्रमांक ६ तेल आणि वायू या इंधनावर चालतो. तेल आणि वायूचा खर्च जास्त आहे. त्यामुळे या संचातील वीजनिर्मितीचा खर्च सरासरी नऊ रुपये प्रतियुनिट येतो. त्यामुळे आता या वीजसंचाचे आधुनिकीकरण करून तो कोळशावर चालवण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी ११७४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजनिर्मितीचा खर्च साडेआठ रुपये प्रति युनिटवरून चार रुपये ४८ पैसे प्रति युनिट इतकी खाली येणार आहे. परिणामी वीजग्राहकांना वीजदरात त्याचा लाभ होईल, असे ‘टाटा पॉवर’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वीजनिर्मितीनंतर कोळशाच्या राखेचा त्रास परिसरात होऊ नये यासाठी ‘फ्लू गॅस डिसल्फरायझेशन’ ही विशेष यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे राखेच्या उत्सर्जनाचे प्रमाण नियंत्रणात राहील, राखेचा उपयोग सिमेंटनिर्मिती, काँक्रिट यासाठी करण्यात येईल, असा दावा ‘टाटा पॉवर’ने केला आहे.
प्रकल्पास विरोध करणाऱ्यांनी आपले मुद्दे मांडल्यानंतर ‘एमपीसीबी’च्या अधिकाऱ्यांनी या आक्षेपांना ‘टाटा पॉवर’चे अधिकारी उत्तर देतील, असे जाहीर केले. पण विरोधकांनी जोरदार गोंधळ घालत त्यास परवानगी दिली नाही. गोंधळ थांबत नसल्याने अखेर सुनावणी आटोपती घेण्यात आली.

Story img Loader