पेशव्यांच्याविरोधानंतर ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाला प्रदर्शनादिवशी राजकीय पक्षांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने ‘सिटीप्राईड’ चित्रपटगृहातील ‘बाजीराव-मस्तानी’चे आजच्या दिवसातील संपूर्ण खेळ रद्द करावे लागले. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी चित्रपटांच्या प्रदर्शनांना विरोध करून चित्रपटांचे खेळ रद्द करण्यास लावणे पटते का? असा प्रश्न ‘लोकसत्ता नेटकौल’च्या माध्यमातून वाचकांना विचारण्यात आला होता. त्यावर बहुतेक नेटिझन्सने चित्रपटांना विरोध ही राजकीय पक्षांची स्टंटबाजी असल्याचे मत व्यक्त केले, तर काहींनी विरोधाचे समर्थन देखील केले. ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदीची मागणी करणारे राजकीय पक्ष भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे स्वत:च्या पक्षावर बंदी आणण्यासाठी पुढाकार घेणार का? असा सवाल महेश गावडे यांनी उपस्थित केला. राजकीय पक्षांना विरोध करायचाच असेल तर चित्रपटाचा नाही समाजातील संकुचित मानसिकतेला विरोध करायला हवा, असा सल्ला अरुण चव्हाण यांनी दिला आहे.
चित्रपटांना विरोध केल्यामुळे उलट चित्रपटाची फुकटची जाहिरात होते आणि खेळ बंद पडल्यामुळे सरकारचा महसूल बुडतो. ज्यांना एखाद्या चित्रपटाबद्दल आक्षेप असेल त्यांनी त्या विषयावर त्यापेक्षा चांगला चित्रपट काढावा म्हणजे पहिल्या चित्रपटातील चुकीचे मुद्दे त्यांना ठळकपणे समोर आणता येतील, असेही अरुण चव्हाण यांनी म्हटले आहे. ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटातील गाण्यामध्ये काशीबाई आणि मस्तानी यांना एकत्र नाचत असल्याचे दाखविण्यात आल्याने प्रदर्शनाआधीचापासून विरोधाचा ‘पिंगा’ सुरू होता. भाजपने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्यादिवशी या वादात उडी घेत पुण्यात ‘बाजीराव-मस्तानी’चे खेळ बंद पाडले. चित्रपटाला विरोध करण्याच्या राजकीय पक्षाच्या या भूमिकेला काही नेटिझन्सनी पाठिंबा देखील दिला आहे. एखाद्या चित्रपटामुळे समाजावर विपरीत परिणाम होणार असेल तर बंदी घातलीच पाहिजे. तसे कोणी करेल, तर राजकीय पक्षाने तसे करणे हे कर्तव्यच असल्याचे मत संदीप वाजळे यांनी व्यक्त केले आहे. राजकीय पक्ष हे जनतेचेच नेतृत्त्व करतात त्यामुळे एखाद्या पक्षाने समाजाच्या भावनेचा विचार करून चित्रपटाचा खेळ बंद पाडला तर काय हरकत? असा प्रश्न अमित खेडकर यांनी उपस्थित केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा