भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मागील काळात मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामांवर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, मंगळवारी (५ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या आरोपांवर विचारलं असता त्यांनी मी वॉर रुमच्या लाईव्ह कॅमेरातून बघितल्याचं सांगत नालेसफाई झाल्याचं मत व्यक्त केलं. नालसफाई झाली असल्यानेच पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी पाणी तुंबलं नाही, असंही त्यांनी नमूद केलं. यानंतर शेलार आणि शिंदे यांच्या विरोधाभासी प्रतिक्रियेंची जोरदार चर्चा आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “मी बीएमसीच्या वॉर रुममध्ये लावलेल्या कॅमेरांमध्ये लाईव्ह बघितलं. ज्या नेहमीच्या ठिकाणी पाणी साचतं तिथे पाणी नाही. त्यावरून नालेसफाई व्यवस्थित झाली असेल असं दिसतं. त्यामुळेच तेथे पाणी तुंबलं नाही. जेथे पाणी साचलं आहे तेथे विशिष्ट प्रमाणात पाणी साठलं की पंपिंग करून काढलं जाईल.”
“बीएमसीने काम केलं, त्यामुळेच पाणी तुंबणं बंद झालं”
“मी मुंबई महापालिकेचं काम पाहिलं. तिथे सर्व स्पॉट लाईव्ह दिसत होते. आधी हिंदमाता येथे पाणी साठत होतं, यावेळी तिथं पाणी नाही. याचा अर्थ बीएमसीने तेथे काम केलं आहे. त्यामुळेच तेथे पाणी तुंबणं बंद झालं आहे. त्यामुळे आपण नकारात्मक बोलण्यापेक्षा सकारात्मक विचार करावा. ते आणखी पंपिंग स्टेशन्स करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणी तुंबण्याचा पूर्ण प्रश्न सुटेल,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
मुंबईत खड्ड्यांचा प्रश्न, तुम्ही महापालिकेत लक्ष घालणार का? एकनाथ शिंदे म्हणाले…
एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी मुंबईत खड्ड्यांचा प्रश्न आहे सांगत तुम्ही महापालिकेत लक्ष घालणार का? असा सवाल केला. यावर ते म्हणाले, “मी आयुक्तांना सांगितलं आहे की, दरवेळी लोकांना खड्ड्यांचा त्रास होतो. तो होऊ नये म्हणून रस्ते काँक्रेटिकरणाचा कार्यक्रम वाढवला पाहिजे. रस्त्यांची गुणवत्ताही सुधारली पाहिजे.”
“रस्त्यांची गुणवत्ता चांगली असली पाहिजे म्हणजे ते टिकतील”
“आपल्याला एकाचवेळी सर्व रस्ते काँक्रिटचे करता येत नाही. त्यामुळे जे रस्ते होतील त्या रस्त्यांची गुणवत्ता चांगली असली पाहिजे म्हणजे ते टिकतील. याबाबत मी सूचना दिल्या आहेत. या पावसाळ्यात खड्डे पडले तर पालिकेने कोल्ड मिक्सची व्यवस्था केली आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करणं शक्य होईल,” असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.
“आतापर्यंत ३ हजार ५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील पावसाचा आढावा घेत प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ३ हजार ५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. दरड कोसळण्याची शक्यता आहे या भागातील नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी नेण्याचे निर्देश दिल्याची माहिती त्यांनी दिली.
बीएसटी आणि एसटीच्या बसेस उपलब्ध करून देण्यासाठी सूचना
“मुंबई लोकल रेल्वेच्या २५ ठिकाणी पाणी साठल्याने रेल्वे ठप्प होते. त्या ठिकाणी बीएमसी आयुक्तांना वार्ड ऑफिसरची नेमणूक करण्यास सांगितले आहे. त्याशिवाय जेथे पाणी साठते त्या ठिकाणी बीएसटी आणि एसटीच्या बसेस उपलब्ध करून देण्यासाठी सूचना केल्या आहेत. यामुळे कामासाठी प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांना अधिकचा आर्थिक बार सोसावा लागणार नाही,” अशीही माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
मुंबईतील पावसावर ५००० सीसीटीव्हीद्वारे लक्ष
मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आढावा घेतला व सूचना केल्या. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या ५००० सीसीटीव्हीद्वारे शहरात पडणाऱ्या पावसाच्या सद्यस्थितीवरती पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येते याबाबत आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी माहिती दिली.