मूक-बधिर विद्यार्थ्यांसमोर कमरेला पिस्तूल लावून भाषण करणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महाजन यांचे हे कृत्य किळसवाणे असल्याची टीका राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी केली, तर महाजन यांना अधिक संरक्षणाची गरज असून त्यांना मशीनगन किंवा तोफ द्या असा उपरोधिक टोला छगन भुजबळ यांनी लगावला. विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत सभात्यागही केला. तथापि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानाधारक शस्त्र हे बाळगण्यासाठीच असते असे समर्थन करत विरोधक याचे राजकारण करत असल्याची टीका केली.
विधानसभेत सोमवारी कामकाज सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी जलसंपदामंत्री महाजन यांचे पिस्तूल प्रकरण उघड करत अध्यक्षांनी यावर आपली भूमिका मांडावी अशी मागणी केली.
अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी यापुढे कोणत्याही मंत्र्याने उघडपणे पिस्तूल बाळगू नये असे निर्देशही दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘त्यात बेकायदेशीर नाही’
गेली वीस वर्षे त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना असून शस्त्र हे जवळ बाळगण्यासाठीच असते असे मुख्यमंत्री म्हणाले. शस्त्र घरी ठेवण्यासाठी परवाना कोणी घेत नसतो, असे सांगत महाजन यांच्या पिस्तूल बाळगण्यात काहीही बेकायदेशीर नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तथापि उघडपणे हे पिस्तूल दिसणार नाही याची काळजी घेण्याची सूचना त्यांना करण्यात येईल, असे सांगून विरोधक केवळ राजकारणासाठी टीका करत असल्याचे ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition demand resignation of minister girish mahajan