मुंबई : मालाड येथे अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यास गेलेल्या पालिकेच्या पथकाला एका विचित्र घटनेला सामोरे जावे लागले. अनधिकृत बांधकाम करणाऱ्याने तोडक कारवाईला विरोध केला. मात्र अधिकारी मागे हटत नसल्याचे पाहून त्याने जवळच असलेली वीट स्वतःच्याच डोक्यात वारंवार मारून घेतली. तसेच स्वतःला जाळून घेण्याची धमकीही दिली. या प्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात पालिका प्रशासनाने तक्रार दाखल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालाड पश्चिमेकडील मार्वे येथे बगिचा हॉटेलसमोर एका मोकळ्या जागेवर एक अनधिकृत गाळा बांधण्यात आला आहे. या गाळ्याचे बांधकाम तोडण्यासाठी पालिकेचे अधिकारी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास गेले असता ही घटना घडली. मुकादम आणि चार कामगार व एक जेसीबी असे पथक दुय्यम अभियंत्यांसोबत घटनास्थळी गेले होते. पाडकाम करत असताना या गाळ्याचे मालक योगेश राव यांनी पथकाला कारवाई करण्यास विरोध केला. आधी त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, धक्काबुकी केली. तरीही कारवाई थांबत नसल्याचे पाहून राव यांनी पालिकेच्या अभियंत्यांला शिविगाळ करण्यास सुरुवात केली व तसेच त्याला नोकरी घालवण्याची धमकी दिली. तरीही पथकाने कारवाई न थांबवल्यामुळे राव याने जवळच असलेली वीट घेऊन स्वतःच्याच डोक्यात मारण्यास सुरुवात केली. तसेच तुम्ही इथून गेला नाहीत तर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेईन, अशी धमकीही दिली. त्यानंतर उपस्थितांनी राव याला समजावून शांत केले. मात्र याप्रकरणी पालिकेच्या पी उत्तर विभागाने मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी वरील माहिती दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition in malad against action against unauthorized construction mumbai print news amy